वडील म्हणायचे, नापास झाला तर तुझी फी तूच भर; उसेन बोल्टने सांगितली घरची परिस्थिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:06 IST2025-05-04T08:05:51+5:302025-05-04T08:06:24+5:30
भावडांसोबत दिवसभर गल्लीत क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्यात बालपण गेलं. तेव्हा वाटलं नव्हतं की मी कधी जगातला सर्वात वेगवान माणूस बनेल.

वडील म्हणायचे, नापास झाला तर तुझी फी तूच भर; उसेन बोल्टने सांगितली घरची परिस्थिती...
मैका देशाच्या उत्तर-पश्चिम भागातील अत्यंत लहान गाव शेरवुड कंटेंट. डोंगराळ भागातील या खेड्यात तेव्हा ना नीट रस्ते, ना वीज. ना प्रत्येक घरी पाण्याची सोय. अशा स्थितीत एका गरीब कुटुंबात जन्म झाला. आई-वडिल दोघे गावात एक किराणा दुकान चालवाचे. त्यातूनच त्यांनी घरखर्च भागवून आम्हाला शिकविले.
भावडांसोबत दिवसभर गल्लीत क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्यात बालपण गेलं. तेव्हा वाटलं नव्हतं की मी कधी जगातला सर्वात वेगवान माणूस बनेल. गावातील सरकारी शाळेत धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचो. वयाच्या १२ वर्षीच ठरवलं की, खेळात करियर करायचे पण फुटबॉल की क्रिकेट हा गोंधळ होताच. एकदा क्रिकेटच्या प्रशिक्षकाने पिचवर धावण्याची गती पाहिली आणि सल्ला दिला की मी धावण्याचा सराव करावा. यातून माझी भेट एका प्रशिक्षकाशी झाली. जे स्वतः ऑलिंपिक धावपटू होते. त्यांनी माझ्या वेगावर विश्वास ठेवला. सगळ्यांना माझ्यातली क्षमता दिसत होती, पण मीच कधी ती गंभीरपणे घेतली नव्हती. १५ वर्षाचा असताना विभागीय स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. पुढे वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये एक सुवर्ण पदकासह तीन पदके मिळवली. नंतर थांबलोच नाही, अनेक नवनवीन विक्रम प्रस्थापित करत गेलो.
आई-वडिलांकडून शिकलो
आई-वडील माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहेत. माझ्या बालपणी ते खूप मेहनत करत असत. ते गरीबीत खूप साधं जीवन जगले. त्यांच्याकडूनच मी शिकलो की परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मेहनत आणि सचोटीने जगावं.
...तर वेगवान गोलंदाज असतो
मी स्वतःवर फारसा दबाव आणत नाही. मला आव्हानं स्वीकारायला आवडतात. माझे स्वप्न होते की मी एक वेगवान गोलंदाज बनेल. वडील क्रिकेटचे चाहते होते. त्यांच्याकडूनच मी प्रेरणा घेतली होती. आज धावपटू नसतो, तर कदाचित वेगवान गोलंदाज असतो.
स्वतःवर मर्यादा घालू नका
मी दाखवून दिले की काहीही शक्य आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, स्वतःवर मर्यादा घालू नका. तुम्हाला काय चांगलं जमतं किंवा काय आवडतं हे शोधा आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत करा. ते करताना मजा घ्या, त्यामुळे आयुष्य अजून सुंदर होतं.
वडील कडक शिस्तीचे : आमचे वडील कडक शिस्तीचे. एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकासारखे ते घर चालवाचे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा स्पष्ट आणि ठाम दृष्टिकोन होता. ते म्हणायचे की, मी तुझ्या शाळेची फी फक्त एकदाच भरतो! पास झाला तर ठीक आहे, पण नापास झाला, तर पुढच्या वेळची फी तू
स्वतः भर.
संकलन : महेश घोराळे