न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी
By Admin | Updated: October 27, 2016 04:32 IST2016-10-27T04:32:24+5:302016-10-27T04:32:24+5:30
मार्टिन गुप्टिलकडून मिळालेल्या शानदार सुरुवातीनंतर टीम साऊदीच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने आज येथे चौथ्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात

न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी
रांची : मार्टिन गुप्टिलकडून मिळालेल्या शानदार सुरुवातीनंतर टीम साऊदीच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने आज येथे चौथ्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतावर १९ धावांनी मात करून रांचीचे मैदान जिंकले. त्याचबरोबर, ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी न्यूझीलंडने साधली.
मार्टिन गुप्टिलने ८४ चेंडूंत १२ चौकारांसह ७२ धावांची खेळी करताना टॉम लॅथम (३९) याच्या साथीने ९६ धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार केन विल्यम्सन (४१) आणि रॉस टेलर (३५) यांनीदेखील योगदान दिले; परंतु भारताने अखेरच्या षटकांत चांगली गोलंदाजी करताना न्यूझीलंडला ७ बाद २६० धावांवर रोखले.
प्रत्युत्तरात भारतीय संघ ४८.४ षटकांत २४१ धावांत गारद झाला. गेल्या सामन्यातील शतकवीर कोहली पुन्हा त्याच्या लयीत दिसला; परंतु तो ४५ धावाच करू शकला. त्यानंतर न्यूझीलंडने भारतीय फलंदाजी फळीवर दबाव वाढविला. अजिंक्य रहाणेने ५७ धावांची खेळी केली, तर अक्षर पटेल (३८) आणि धवल कुलकर्णी (नाबाद २५) यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली; परंतु त्यामुळे फक्त पराभवाचे अंतर कमी झाले.
आता या दोन संघांत २९ आॅक्टोबर रोजी विशाखापट्टणम् येथे होणारा सामना निर्णायक बनला आहे. रोहित शर्माचा वनडे मालिकेतील खराब फॉर्म येथेही तसाच राहिला. त्याला आतापर्यंत चार सामन्यांत फक्त ५३ धावा करता आल्या. त्याने ट्रेंट बोल्ट (४८ धावांत २ बळी) याला पॉइंटवर सुरेख फटका मारला; परंतु पुढील षटकात साऊदी (४० धावांत ३ बळी) याच्या आऊटस्विंगरवर तो यष्टिरक्षक बी. जे. वॅटलिंगकरवी झेलबाद झाला. रहाणेदेखील चांगल्याच लयीत दिसला, तर कोहली नेहमी त्याच्या सदाबहार अंदाजात खेळात होता. रहाणेने सामन्यातील पहिला षटकारदेखील ठोकला. त्याने बोल्टचा उसळता चेंडूंवर पॉइंटला षटकार ठेकला. कोहलीने मिशेल सँटेनरला षटकार ठोकून रहाणेला मागे टाकले; परंतु लेगस्पिनर ईश सोढीचा चेंडू त्याच्या बॅटला लागून यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला.
त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला; परंतु घरच्या मैदानावर त्याने पाठीराख्यांना निराश केले. ११ धावांवर तो जेम्स निशाम (३८ धावांत २ बळी) याच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. निशामने रहाणेला पायचीत केले आणि धोनीच्या बाद होण्याने भारत पूर्णपणे बॅकफूटवर ढकलला गेला. रहाणेने ७० चेंडूंत ५ चौकार व एक षटकार मारला.
मनीष पांडे (१२) आणि केदार जाधव (०) यांनीदेखील निराशा
केली. या दोघांना साऊदीने सलग चेंडूंवर बाद करून भारताच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी पाडले. अक्षर पटेल आणि अमित मिश्रा
(१५) यांनी आठव्या गड्यासाठी
३८, तर धवल कुलकर्णी व उमेश
यादव (७) यांनी दहाव्या गड्यासाठी विक्रमी ३४ धावांची भागीदारी
करून सामन्यात चुरस वाढवली; परंतु त्याचा निकालावर मात्र परिणाम झाला नाही.(वृत्तसंस्था)
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. धोनी गो. पांड्या ७२, टॉम लॅथम झे. रहाणे गो. पटेल ३९, केन विल्यम्सन झे. धोनी गो. मिश्रा ४१, रॉस टेलर धावबाद ३४, जेम्स निशाम झे. कोहली गो. मिश्रा ६, बीजे वॉटलिंग झे. रोहित गो. कुलकर्णी १४, अँटन डेव्हिच झे. पांड्या गो. यादव ११, मिशेल सँटेनर नाबाद १७, टीम साऊदी नाबाद ९, अवांतर : १७, एकूण : ५० षटकांत ७ बाद २६० धावा. गडी बाद क्रम : १/९६, २/१३८, ३/१८४, ४/१९२, ५/२१७, ६/२२३, ७/२४२. गोलंदाजी : उमेश यादव १०-१-६०-१, कुलकर्णी ७-०-५९-१, पांड्या ५-०-३१-१, मिश्रा १०-०-४१-२, पटेल १०-०-३८-१, जाधव ८-०-२७-०.
भारत : रहाणे पायचीत गो. निशाम ५७, रोहित शर्मा झे. वॅटलिंग गो. साऊदी ११, विराट कोहली झे. वॅटलिंग गो. सोढी ४५, धोनी त्रि.गो. निशाम ११, अक्षर पटेल त्रि.गो. बोल्ट ३८, मनीष पांडे झे. लॅथम गो. साऊथी १२, केदार जाधव पायचीत गो. साऊदी ०, पंड्या झे. लॅथम गो. सँटेनर ९, मिश्रा धावबाद १४, धवल कुलकर्णी नाबाद २५, उमेश यादव झे. टेलर गो. बोल्ट ७. अवांतर : १२. एकूण : ४८.४ षटकांत सर्व बाद २४१. गडी बाद क्रम : १-१९, २-९८, ३-१२८, ४-१३५, ५-१५४, ६-१५४, ७-१६७, ८-२०४, ९-२०७. गोलंदाजी : साउदी ९-०-४०-३, बोल्ट ९.४-१-४८-२, निशाम ६-०-३८-२, सँटेनर १०-०-३८-१, सोढी १०-१-५२-१, डेवीच ४-०-२२-०.