वेस्ट इंडीजपुढे इंग्लंडचे आव्हान
By Admin | Updated: March 16, 2016 08:39 IST2016-03-16T08:39:45+5:302016-03-16T08:39:45+5:30
कोणताही सामना कुठल्याही क्षणी फिरवण्याची क्षमता असलेला वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी बुधवारी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध भिडेल.

वेस्ट इंडीजपुढे इंग्लंडचे आव्हान
मुंबई : कोणताही सामना कुठल्याही क्षणी फिरवण्याची क्षमता असलेला वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी बुधवारी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध भिडेल. दोन माजी विजेत्यांमध्ये होणाऱ्या या लढतीत चौकार - षटकारांचा पाऊस पडण्याची क्रिकेटप्रेमींना आशा आहे.
बांगलादेशमध्ये २०१२ मध्ये दिमाखात विश्वविजेतेपद पटकावून पुन्हा एकदा क्रिकेटजगतावर आपला झेंडा रोवलेल्या वेस्ट इंडीजची प्रमुख मदार अष्टपैलू खेळाडूंवर आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजमध्ये २०१० मध्ये जगज्जेते झालेले इंग्लंडही विजयी सुरुवातीच्या प्रयत्नात असल्याने काँटे की टक्कर पाहण्यास मिळेल.
वानखेडेवर फलंदाजांची कामगिरी नेहमीच बहरलेली असली तरी फिरकी गोलंदाजी कायम निर्णायक राहिली आहे. त्यामुळेच इंग्लंडची बाजू थोडी वरचढ दिसत असून वेस्ट इंडिजला सुनील नारायणच्या अनुपस्थितीचा मोठा फटका बसेल. लेगस्पिनर आदिल राशिद, आॅफस्पिनर मोईन अली व अष्टपैलू लियाम डासन यांचा मारा इंग्लंडसाठी महत्त्वाचा ठरेल. त्याचवेळी वेस्ट इंडीजकडे सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन यांच्यासह अष्टपैलू मार्लन सॅम्युअल्स व ख्रिस गेल असा पर्याय आहे. फलंदाजीत वेस्ट इंडिजची मुख्य मदार विध्वंसक ख्रिस गेलवर आहे. त्याची बॅट तळपली तर इंग्लंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडतील.
मात्र गेलला लवकर बाद करण्यात यशस्वी ठरल्यास इंग्लंड अर्धी लढाई जिंकतील. त्यामुळेच गेलची खेळी निर्णायक ठरणारी आहे. त्याचवेळी किरॉन पोलार्ड, लेंडल सिमन्स व अष्टपैलू डॅरेन ब्राव्हो यांची कमतरता विंडीजला नक्की भासेल. इंग्लंडच्या फलंदाजीची मदार इयान मॉर्गन, ज्यो रुट, बेन स्टोक्स व जोस बटलर या चौकडीवर असून जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स यांची वेगवान सुरुवात इंग्लंडला महत्त्वपूर्ण असेल.
(क्रीडा प्रतिनिधी)
वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स,
आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, जेसन होल्डर, एविन लुईस, अॅश्ले नर्स, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, मार्लन सॅम्युअल्स, जेरोमी टेलर.
इंग्लंड : इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स विन्स, अॅलेक्स हेल्स, ज्यो रुट, मोईन अली, जोस बटलर, बेन स्टोक्स, सैम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, लियाम प्लंकेट, रिसी टोपले, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद,
लियाम डासन.
हेड टू हेड
इंग्लंड व वेस्ट इंडीज या संघांनी आत्तापर्यंत एकूण १२ सामने झाले आहेत. त्यामध्ये इंग्लंडने ४ तर वेस्ट ुइंडीज संघाने ८ सामने जिंकले आहेत.
सामन्याची वेळ
सायंकाळी ७.३० पासून
स्थळ :
वानखेडे स्टेडियम, मुंबई