ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान मी उत्तेजक चाचणीत दोषी ठरले होते - शारापोव्हा
By Admin | Updated: March 8, 2016 10:00 IST2016-03-08T09:10:23+5:302016-03-08T10:00:08+5:30
टेनिस जगतातील एकेकाळची अव्वल खेळाडू असलेल्या मारिया शारापोव्हाने आपण उत्तेजक चाचणीत दोषी ठरलो होतो, अशी धक्कादायक कबूली दिली.

ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान मी उत्तेजक चाचणीत दोषी ठरले होते - शारापोव्हा
>ऑनलाइन लोकमत
लॉस एँजिलिस, दि. ८ - टेनिस जगतातील एकेकाळची अव्वल खेळाडू असलेल्या मारिया शारापोव्हाने आपण उत्तेजक चाचणीत दोषी ठरलो होतो, अशी धक्कादायक कबूली दिली. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ती बोलत होती. ' ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्यावेळी मी उत्तेजक चाचणीत दोषी ठरले होते' असे सांगतानाच या चुकीसाठी सर्वस्वी आपणच जबाबादार असल्याचेही तिने कबूल केले. दरम्यान मारियाच्या या कबुली जबाबामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन तिच्यावर एक वर्ष व त्याहून अधिक काळाची बंदी घालण्याची शक्यता असून तसे झाल्यास तिची कारकीर्द कायमची संपू शकते.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान मारिया शारापोव्हाच्या उत्तेजक चाचणीत मेल्डोनियम हा घटक आढळून आला होता, असे समजते. मात्र आरोग्याच्या समस्येमुळे गेल्या दहा वर्षांपासून आपण मेल्डोनियम असलेल्या औषधांचे सेवन करत असल्याचे तिने नमूद केले. मधुमेह व मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण हे औषध घेत होतो, असे तिने नमूद केले.
दरम्यान, मेल्डोनियमच्या सेवनावर जागतिक डोपिंगविरोधी संस्थेने या वर्षीपासूनच बंदी घातली आहे. मारियाच्या चाचणीत तोच घटक आढळल्याने ती दोषी आढळली. मात्र त्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नव्हते असा दावा करत तिने या चुकीची जबाबदारी स्वीकारून या कृत्यासाठी चाहत्यांची माफी मागितली. तसेच आपल्याला आणखी एक संधी दिली जाईल, अशी आशाही शारापोव्हाने व्यक्त केली.