मेलबर्न : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोवीचने वर्चस्व कायम राखताना क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रिटनच्या अॅण्डी मरेचा रविवारी अंतिम लढतीत ६-१, ७-५, ७-६ ने पराभव केला आणि आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी सहाव्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोवीचचा चक्रव्यूह भेदत जेतेपद पटकावण्यात यश येईल, अशी मरेला आशा होती; पण शानदार फॉर्मात असलेल्या जोकोवीचने ब्रिटनच्या खेळाडूला कुठलीच संधी दिली नाही. जोकोवीचनने मरेविरुद्ध कारकिर्दीत जय-पराजयाची कामगिरी २२-९ अशी केली. मरेचा वडील बंधू जेमी मरेने शनिवारी पुरुष दुहेरीत जेतेपद पटकावले होते; पण अॅण्डी मरेला आज आनंद द्विगुणित करण्यात अपयश आले. जोकोवीचने पहिला सेट केवळ ३० मिनिटांमध्ये ६-१ ने जिंकला. मरेने दुसऱ्या सेटमध्ये संघर्ष केला. हा सेट ८० मिनिटे रंगला; पण जोकोवीचने या सेटमध्ये ७-५ ने सरशी साधत २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये मरेला संधी होती. टायब्रेकपर्यंत लांबलेल्या या सेटमध्ये सर्बियन खेळाडू वरचढ ठरला. जोकोवीचने टायब्रेकमध्ये ३-० आणि ५-१ अशी आघाडी घेताना ७-३ ने सरशी साधली आणि विक्रमी सहाव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदावर नाव कोरले. तिसरा सेट ६३ मिनिट रंगला. जोकोवीचला या लढतीत सर्व्हिस भेदण्याच्या आठ संधी मिळाल्या. त्यापैकी दोनदा तो यशस्वी ठरला. मरेला दोनदा सर्व्हिस ब्रेकची संधी मिळाली. तो एकदा सर्व्हिस भेदण्यात यशस्वी ठरला. मरेने २१ तर जोकोवीचने ८ विनर्स लगावले. मरेने या लढतीत ३४ टाळण्याजोग्या चुका केल्या तर जोकोवीचने त्या तुलनेत केवळ १९ टाळण्याजोग्या चुका केल्या. २८ वर्षीय जोकोवीचने मेलबर्नमध्ये ५७-६ अशी विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने येथे २००८ मध्ये प्रथमच जेतेपद पटकावले होते. त्या वेळी त्याने जो विल्फ्रेड त्सोंगाचा पराभव केला होता. त्यानंतर २०११ मध्ये मरेचा, २०१२ मध्ये स्पेनच्या राफेल नदालचा, २०१३ मध्ये मरेचा, २०१५ मध्ये मरेचा आणि २०१६ मध्ये पुन्हा एकदा मरेचा पराभव करीत जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली. जोकोवीचने ११ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावताना स्वीडनचा महान टेनिसपटू ब्योन बोर्ग आणि आॅस्ट्रेलियाच्या रोड लेव्हरच्या विक्रमाची बरोबरी केली. सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या कामगिरीत जोकोवीच संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहे. स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने फ्रेंच ओपनमध्ये जेतेपद पटकावित जोकोवीचला कॅलेंडर स्लॅमपासून रोखले. जोकोवीचने २ तास ५३ मिनिटे रंगलेल्या या लढतीत विजय मिळवताना जेतेपद कायम राखले आणि आॅस्ट्रेलियाच्या रॉय एमरसनच्या सहा वेळा जेतेपद पटकावण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली. जोकोवीचने येथे २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१६ मध्ये जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. २८ वर्षीय जोकोवीचचे हे ११ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. त्यात सहा आॅस्ट्रेलियन ओपन, तीन विम्बल्डन आणि दोन यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या जोकोवीचने आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावण्याच्या मरेच्या स्वप्नांवर पाच वेळा पाणी फेरले. यापूर्वी मरेला २०१०, २०११, २०१३ आणि २०१५ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जोकोवीचविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे.
जोकोवीच अजिंक्य
By admin | Updated: February 1, 2016 02:34 IST