कणखर मानसिकतेसह जिद्दीच्या जोरावर दिव्या यशस्वी: हंगेरियन-अमेरिकन ग्रँडमास्टर सुसान पोल्गर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:06 IST2025-07-30T09:05:27+5:302025-07-30T09:06:04+5:30
१९ वर्षीय दिव्या हिने सोमवारी अनुभवी आणि उच्च मानांकित भारताच्याच कोनेरू हम्पी हिला पराभूत करून ऐतिहासिक विश्वचषक पटकावला.

कणखर मानसिकतेसह जिद्दीच्या जोरावर दिव्या यशस्वी: हंगेरियन-अमेरिकन ग्रँडमास्टर सुसान पोल्गर
नवी दिल्ली : ‘भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने मानसिक कणखरता आणि जिंकण्याच्या तीव्र इच्छेच्या जोरावर फिडे महिला विश्वचषक पटकावला,’ असे हंगेरियन-अमेरिकन ग्रँडमास्टर सुसान पोल्गर यांनी म्हटले. १९ वर्षीय दिव्या हिने सोमवारी अनुभवी आणि उच्च मानांकित भारताच्याच कोनेरू हम्पी हिला पराभूत करून ऐतिहासिक विश्वचषक पटकावला. यासह ती २०२६ कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली असून भारताची ८८वी ग्रँडमास्टरही बनली.
वृत्तसंस्थेशी संवाद साधताना पोल्गर म्हणाल्या की, ‘दिव्याला तिच्या ऐतिहासिक विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा. ही एक अद्भुत कामगिरी होती. स्पर्धेच्या सुरुवातीला ती विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार नव्हती. परंतु, तिची मानसिक ताकद आणि विजयाची तीव्र इच्छा यामुळे तिने हे शक्य करून दाखविले. काही डावांमध्ये ती संकटात होती. काही वेळा संधी हातून गेलीही; पण अखेरच्या क्षणापर्यंत लढण्याची तिची वृत्ती हेच तिचे बलस्थान ठरले.’
१९९६ ते १९९९ दरम्यान महिला विश्वविजेती राहिलेल्या पोल्गर यांनी मान्य केले की, भारतीय बुद्धिबळ आता यशाचे नवे शिखर गाठत आहे. त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा विश्वनाथन आनंदसारखा दिग्गज नव्या पिढीला मार्गदर्शन करतो, तेव्हा भारताचे भविष्य निश्चितच उज्ज्वल ठरणार आहे.’ त्यांनी युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशचे उदाहरण देताना सांगितले की, ‘जेव्हा गुकेश १२ वर्षांचा असताना ग्रँडमास्टर बनला, तेव्हा तो सर्वोच्च मानांकित भारतीय खेळाडूंमध्येही नव्हता. पण, त्याच्याकडे असलेली क्षमता मी लगेच ओळखली. हेच मी दिव्यामध्येही पाहिले आहे.’
दिव्या सध्या भारतातील सर्वोच्च मानांकनाच्या खेळाडूंपैकी नाही. पण, तिच्यात विजेता बनण्याचे गुण आहेत. या तरुण खेळाडूंमध्ये भीती नाही आणि तीव्र जिद्द आहे. कधी-कधी यामुळे त्यांचे अपूर्ण कौशल्यही झाकले जाते. पण, मेहनत, अनुभव आणि सातत्यपूर्ण सरावाने त्या उणिवाही भरून निघतील.
सुसान पोल्गर