Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 16:06 IST2025-12-13T16:05:04+5:302025-12-13T16:06:43+5:30
Salt Lake Stadium Case: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक करण्यात असून प्रेक्षकांचे तिकीटांचे पैसे परत केले जातील, असे अश्वासन प्रशासनाने दिले.

Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
अर्जेंटिनाचा फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी याच्या 'GOAT इंडिया टूर'मुळे पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एकीकडे उत्साह असला तरी, दुसरीकडे सॉल्ट लेक स्टेडियम येथे प्रचंड गोंधळ आणि तणाव पाहायला मिळाला. मेस्सीला नीट पाहता येत नसल्याने हे चाहते संतप्त झाले आणि त्यांनी स्टेडियममध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून, अखेरीस पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ पळापळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
लिओनेल मेस्सी भारतात दाखल झाल्यानंतर चाहत्यांनी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केले. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत तिथून निघून गेल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी कार्यक्रमाचा मुख्य आयोजक सतद्रु दत्ता यांना तात्काळ अटक केली. शिवाय, चाहत्यांना नुकसान भरपाई म्हणून तिकिटांचे पैसे परत केले जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
या घटनेनंतर चाहत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. चाहत्यांनी आयोजकांवर आणि उपस्थित मान्यवरांवर जोरदार टीका केली. एका संतप्त चाहत्याने प्रतिक्रिया दिली की, “ही खूप निराशाजनक घटना आहे. मेस्सी फक्त काही मिनिटांसाठी आला. त्याच्याभोवती फक्त राजकारणी आणि मंत्री होते. आम्हाला त्याला पाहायला मिळाले नाही. त्याने फुटबॉलला स्पर्शही केला नाही. आमचे इतके पैसे आणि वेळ वाया गेला.” दुसऱ्या चाहत्याने आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “मेस्सीभोवती फक्त राजकारणी आणि अभिनेते होते. मग आम्हाला कशासाठी बोलावले? आम्ही १२,००० रुपये खर्च करून तिकीट घेतले. मात्र, तरीही आम्हाला त्याचा चेहरा पाहायला मिळाला नाही.”