पराभवामुळे निराश; पण वन-डेत चमकदार कामगिरी करू : शास्त्री
By Admin | Updated: October 10, 2015 05:36 IST2015-10-10T05:36:22+5:302015-10-10T05:36:22+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री निराश झाले आहेत; पण वन-डे सामन्यांच्या मालिकेत

पराभवामुळे निराश; पण वन-डेत चमकदार कामगिरी करू : शास्त्री
कोलकाता : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री निराश झाले आहेत; पण वन-डे सामन्यांच्या मालिकेत संघ दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टी-२० मालिकेतील अनुभव आगामी विश्वकप स्पर्धेसाठी उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.
पावसाच्या व्यत्ययामुळे तिसरी लढत रद्द झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘‘मी या निकालामुळे निराश झालो. आम्ही विजयासाठी खेळतो, हे खरे आहे; पण त्यामुळे मात्र माझी रात्रीची झोप खराब झालेली नाही. या मालिकेच्या निमित्ताने टी-२० विश्वकप स्पर्धेपूर्वी बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. पहिली लढत संघर्षपूर्ण झाली; पण दुसऱ्या लढतीत मात्र आम्ही कमकुवत ठरलो. मी कुठलेही कारण देणारी नाही. संघ म्हणून द्विपक्षीय मालिकेत आम्ही विशेष टी-२० क्रिकेट खेळलेले नाही, हे सत्य आहे. ’’
शास्त्री पुढे म्हणाले, ‘‘हा युवा संघ असून आम्ही योग्य ताळमेळ शोधण्यास प्रयत्नशील आहोत. दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तयारी करण्याची संधी मिळाली, ही चांगली बाब आहे.’’ पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला इशारा देताना शास्त्री म्हणाले, ‘‘भारताचा वन-डे संघ तुलनेने दर्जेदार आहे. आम्ही दोन सामन्यांतील कामगिरीच्या आधारावर दक्षिण आफ्रिका संघाचा अभ्यास केला आहे. वन-डेमध्ये आम्हाला खेळाची चांगली कल्पना आहे. वन-डे मालिका चुरशीची होईल.’’
शास्त्री पुढे म्हणाले, ‘‘कर्णधार धोनीला नैसर्गिक खेळ करण्यासाठी त्याच्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फॉर्मात असला तर धोनी काय करू शकतो, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. टी-२० विश्वकप स्पर्धेला अद्याप सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, संघात स्थान मिळविण्यासाठी फॉर्म सर्वांत महत्त्वाची बाब आहे.’’
शास्त्री पुढे म्हणाले, ‘‘अद्याप बरेच क्रिकेट खेळायचे आहे. आम्हाला आॅस्ट्रेलियात काही टी-२० सामने खेळायचे असून, त्यानंतर श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येईल.’’(वृत्तसंस्था)
कटकमध्ये आम्हाला चांगले खेळता आले असते; पण आम्ही लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. खेळाडूही यामुळे निराश आहेत. आम्ही येथे पूर्ण लढतीची अपेक्षा केली होती; पण तसे घडले नाही. शिकण्यासाठी बरेच काही आहे. हे सत्र मोठे असून संघासाठी उपयुक्त आहे. आम्ही मालिका गमावली असली, तरी हा अनुभव टी-२० विश्वकप स्पर्धेत उपयुक्त ठरेल.
- रवी शास्त्री