बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:14 IST2025-07-13T06:14:09+5:302025-07-13T06:14:27+5:30
लहानपणापासूनच मला खेळांमध्ये खूप रस. विशेषतः फुटबॉलमध्ये. वडिलही शाळेत खेळाडू होते, पण पैशाच्या अभावामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. - हिमा दास

बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
हिमा दास, धावपटू
साममधील नागांव जिल्ह्यात कांधुलिमारी या अत्यंत लहान गावात जन्म झाला. माझे आई आणि वडील दोघंही भातशेती करणारे शेतकरी होते. त्यांना आर्थिक परिस्थितीने त्यांचे स्वप्न पूर्ण करता आली नाहीत. तेव्हा आम्ही एकत्र कुटुंबात राहायचो. कधीच पुरेसे पैसे नसत.
जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांचीही कमतरता होती. पण या सगळ्यात आई-वडिलांनी नेहमीच मला सांगितले की, 'जे आहे, त्यात सर्वोत्तम दे.'
लहानपणापासूनच मला खेळांमध्ये खूप रस. विशेषतः फुटबॉलमध्ये. वडिलही शाळेत खेळाडू होते, पण पैशाच्या अभावामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ते मला शक्य तेवढे खेळायला मदत करत आले. काही दिवस तर माझ्याकडे बूट घ्यायलाही पैसे नव्हते, खेळण्यासाठी योग्य मैदान नव्हते म्हणून मी चिखल, शेतात सराव करत असे.
एकदा शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी मला खेळताना पाहिले. ते माझ्या धावण्याच्या वेगाने खूप प्रभावित झाले. त्यांनी मला फुटबॉलऐवजी धावपटू होण्यास सांगितले. तसेच प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली. पुढे जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला. मला आधी थोडी भीती वाटली. माझ्या परिस्थितीमुळे मी इतरांपेक्षा मागे पडेल की काय, अशी शंकाही होती. पण सर्व शंका दूर झाल्या.
दोन प्रशिक्षकांनी माझी क्षमता ओळखली. त्यांनी मला आसाममधल्या त्यांच्या कॅम्पमध्ये सहभागी होण्यास सांगितले. तेथे सुरू झाला संघर्ष, खडतर प्रशिक्षण आणि खूप काटेकोर दिनचर्या. पहाटे उठायचं, काही तास ट्रेनिंग, पुन्हा संध्याकाळी ट्रेनिंग. मी १७ वर्षांची होते. हे संघर्षाचे दिवस कसे हाताळायचे हा प्रश्न होता. पण वडिलांनी मला सांगितले, ‘हे छोटे छोटे संघर्षच तुला तुझ्या मोठ्या स्वप्नाकडे घेऊन जातील. एक दिवस तू देशासाठी खेळशील, तेव्हा हे सगळं सार्थ वाटेल.’
परिस्थिती कशीही असो या तीन गोष्टी तुमच्याकडे हव्याच
डोंगर चढून सर्वोच्च शिखरावर पोहोचायची जिद्द असते, तेव्हा तुम्ही कोण आहात, तुमची परिस्थिती कशी आहे, त्याने फरक पडत नाही. तुमच्याकडे फक्त या तीन गोष्टी पाहिजेत.
१) निश्चय : जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे सतत खेचतो.
२) प्रयत्न : जे सतत चालू ठेवले, तर कोणतंही अशक्य काम शक्य होतं.
३) स्वतःवरचा विश्वास : जो तुम्हाला अंधारातही मार्ग दाखवतो.
हिमा दास ही भारतीय धावपटू असून २०१८ मध्ये वर्ल्ड अंडर-२० मध्ये तिने सुवर्ण जिंकले. ती राष्ट्रीय विक्रमधारक
असून ढिंग एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध आहे.
-संकलन : महेश घोराळे