धोनीच्या नेतृत्वामध्ये कमतरता
By Admin | Updated: October 27, 2015 02:45 IST2015-10-26T23:11:32+5:302015-10-27T02:45:35+5:30
मुंबईत झालेल्या निर्णायक सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारताचे माजी दिग्गज फलंदाज लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करताना या पराभवाला

धोनीच्या नेतृत्वामध्ये कमतरता
नवी दिल्ली : मुंबईत झालेल्या निर्णायक सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारताचे माजी दिग्गज फलंदाज लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करताना या पराभवाला त्याला जबाबदार धरले. धोनीच्या नेतृत्वामध्ये कल्पकतेची आणि प्रयोगशीलतेची कमतरता राहिल्याने भारताला पराभवास सामोरे जावे लागले, असे गावसकर यांनी सांगितले.
गोलंदाजी बदलण्याच्या निर्णयावर धोनीच्या नेतृत्वामध्ये कल्पकता बघण्यास मिळाली नाही. त्यामुळे गोलंदाजीमध्ये त्याच्याकडे जास्त विकल्प राहिले नाहीत. याआधी त्याने गोलंदाजीत काही बदल केले; ेमात्र कोणालाही बळी घेण्यात यश आले नाही, असे गावसकर म्हणाले. गोलंदाजी भारताचा सर्वांत मोठा चिंतेचा विषय बनला असून, त्यामुळेच वानखेडेवर भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला, असेही गावसकर यांनी सांगितले.
गोलंदाजीबाबत गावसकर म्हणाले, की सध्याच्या घडीला गोलंदाजी भारतीय संघासाठी सर्वांत मोठी चिंता आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत आपल्या गोलंदाजांची कामगिरी आपण पाहिलीच आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर चेंडू फिरकी आणि उसळी घेत होता; मात्र आपल्या गोलंदाजांनी त्यानुसार गोलंदाजी केली नाही.
आपल्या गोलंदाजांनी १३५च्या वेगाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर आखूड मारा केला. या वेगाने तुम्ही आफ्रिकेच्या फलंदाजांवर आखूड टप्प्यांचा मारा करू शकत नाही. जर तुम्हाला बाउन्सर टाकायचे असतील, तर तुमचा वेग किमान १४५ किमी प्रतितास इतका असावा. या सामन्यात आश्विनच्या अनुपस्थितीत भारतीय उतरले होते. आगामी कसोटी मालिकेत तो खेळेल, अशी आशा आहे, असेही गावसकर म्हणाले. (वृत्तसंस्था)