धोनीने फिरकीपटूंचा चांगला वापर केला
By Admin | Updated: March 11, 2015 00:40 IST2015-03-11T00:40:33+5:302015-03-11T00:40:33+5:30
आयर्लंडविरुद्धच्या लढतीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांच्या खेळातच वेगवान गोलंदाजी अधिक उपयुक्त ठरणार नसल्याचे कर्णधार

धोनीने फिरकीपटूंचा चांगला वापर केला
आयर्लंडविरुद्धच्या लढतीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांच्या खेळातच वेगवान गोलंदाजी अधिक उपयुक्त ठरणार नसल्याचे कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या लक्षात आले. भारतीय संघातर्फे आतापर्यंत वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. चेंडू थांबून येत असेल आणि वळत
असेल, तर धोनी सहज निर्णय घेऊ शकत होता. त्याने अधिक वेळ न दवडता आश्विनला पाचारण केले आणि सुरेश रैनाला १० षटके टाकण्याची संधी दिली. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाची निश्चितच ही योजना नव्हती, कारण न्यूझीलंडमधील मैदाने आकाराने लहान असतात. त्यामुळे फिरकीपटूंना येथे विशेष संधी नसते.
धोनीने मात्र योग्य क्षेत्ररक्षण सजवताना फिरकीपटूंना वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. त्याने आश्विनला सलग ८ षटके गोलंदाजी देताना उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी रवींद्र जडेजाची षटके राखून ठेवली. महागड्या ठरलेल्या उमेश यादवची धोनीने गरजही भासू दिली नाही.
आश्विनला गोलंदाजी करताना बघणे नेहमीच आनंददायी असते. अलीकडेच शेन वॉर्नने समालोचन करताना आश्विनची प्रशंसा केली आहे. आश्विनच्या गोलंदाजीतील टप्पा, वेग आणि एका बोटाचा वापर करून टाकण्यात येणारा आऊटस्विंगर बघितल्यानंतर वॉर्नला निश्चितच आनंद झाला असेल. आश्विनमुळे सामन्यात फिरकी गोलंदाजी बघण्याचा आनंद पुन्हा मिळत आहे.
शिखर धवनने आणखी एक शतक झळकावले. जम बसल्यानंतर सामन्यावर पकड कशी मिळवायची, हे त्याने दाखवून दिले.
संघाची धावसंख्या ९०च्या आसपास असताना दोन्ही फलंदाज प्रत्येकी ४५ धावांवर खेळत होते. त्यानंतर धवनने धावगती वाढवली आणि लवकरच तो ८० धावांवर पोहोचला आणि शतकही पूर्ण केले. त्यामुळेच त्याला धोकादायक फलंदाज मानले जाते. फलंदाजीमध्ये गिअर बदलण्याची क्षमता मोजक्या फलंदाजांमध्ये असते. या लढतीत सुरुवातीपासून भारताने वर्चस्व गाजविले. आयर्लंडची फलंदाजीची बाजू मजबूत आहे; पण फिरकीपटूंविरुद्ध ताळमेळ साधण्यात त्यांचे फलंदाज अपयशी ठरले. खेळपट्टी जर अनुकूल नसेल, तर आयर्लंड संघाच्या अडचणींमध्ये आणखी भर पडते. या लढतीसाठी असलेली खेळपट्टी तशीच होती. त्यामुळे आयर्लंडला मदत मिळाली नाही. भारतीय संघाने आतापर्यंत चांगला खेळ केला आहे. जडेजाला गोलंदाजी व फलंदाजीमध्ये सूर गवसला, तर हा एक समतोल साधला गेलेला संघ होईल. (टीसीएम)