किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्धच्या सामन्यात धोनीने रचला इतिहास
By Admin | Updated: April 8, 2017 19:39 IST2017-04-08T19:39:41+5:302017-04-08T19:39:41+5:30
इंडियन प्रिमियर लिगच्या किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्ध झालेल्या सामन्यात पुणे सुपरजायंट्सच्या महेंद्र सिंग धोनीच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला

किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्धच्या सामन्यात धोनीने रचला इतिहास
>ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 8 - इंडियन प्रिमियर लिगच्या किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्ध झालेल्या सामन्यात पुणे सुपरजायंट्सच्या महेंद्र सिंग धोनीच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. हा धोनीचा 250 वा टी-20 सामना होता. हा रेकॉर्ड करणारा धोनी भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
धोनीनंतर या यादीत सुरेश रैनाचं नाव येतं. रैनाने आतापर्यंत 246 टी-20 सामने खेळले आहेत. तर जगात सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या केरॉन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 359 टी-20 सामने खेळले आहेत.
या सामन्यापूर्वी 249 सामन्यात धोनीने 37.78 च्या सरासरीने आणि 135.73 च्या स्ट्राइक रेटने 5063 धावा बनवल्या. यामध्ये 19 अर्धशतकांचा समावेश आहेत. विशेष म्हणजे 250 सामने खेळणा-या धोनीला टी-20मध्ये शतक ठोकण्यात अजून यश मिळालेलं नाही. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 358 चौकार आणि 210 षटकार ठोकले आहे.
या सामन्यात पंजाबने पुण्याचा 6 विकेट राखून सहज पराभव केला. सामन्यामध्ये धोनीला लौकीकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सुरूवातीच्या विकेट झटपट गेल्यानंतर पुण्याची सर्व मदार धोनीवर होती. पण 11 चेंडूत केवळ पाच धावा काढून तो बाद झाला.
आयपीएलच्या या सत्रात धोनी पहिल्यांदाच एक खेळाडू म्हणून खेळत आहे. त्याच्याजागी स्टिव्ह स्मिथकडे पुण्याच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.