बांगलादेशाचा विजयाचा निर्धार
By Admin | Updated: March 4, 2015 23:54 IST2015-03-04T23:54:28+5:302015-03-04T23:54:28+5:30
विश्वकप स्पर्धेत बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेश संघाला गुरवारी ‘अ’ गटाच्या लढतीत स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळविणे आवश्यक आहे.

बांगलादेशाचा विजयाचा निर्धार
नेल्सन : विश्वकप स्पर्धेत बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेश संघाला गुरवारी ‘अ’ गटाच्या लढतीत स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळविणे आवश्यक आहे. स्पर्धेत तिन्ही सामने गमावणाऱ्या स्कॉटलंड संघाविरुद्ध विजय मिळविला, तर बांगलादेश संघाला बाद फेरी गाठण्यासाठी केवळ एका विजयाची गरज असेल. बांगलादेश संघाला बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळविणे आवश्यक आहे. बांगलादेश संघाला यानंतर इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. चारपैकी तीन सामने गमावणारा इंग्लंड संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता, स्कॉटलंड संघ या स्पर्धेत विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक आहे.
वेगवान गोलंदाजी स्कॉटलंड संघाची मजबूत बाजू आहे. अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत स्कॉटलंड संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. बुधवारी स्कॉटलंड संघाकडे विजयाची सर्वोत्तम संधी आहे. यानंतर त्यांना माजी चॅम्पियन श्रीलंका व आॅस्ट्रेलिया संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बांगलादेश संघाची नजर बाद फेरी गाठण्यावर केंद्रित झाली असली, तर स्कॉटलंड संघ बांगलादेशाचा मार्ग खडतर करण्याच्या निर्धाराने बुधवारी मैदानात उतरेल.
स्कॉटलंडचा कर्णधार प्रेस्टन मोमसेन म्हणाला, ‘‘या लढतीत विजय मिळविण्याची आशा आहे. असोसिएट संघ असलेल्या स्कॉटलंडला पूर्णकालीन सदस्य असलेल्या बांगलादेश संघाविरुद्ध विजय मिळविण्याची ही चांगली संघी आहे. आम्ही या लढतीसाठी सज्ज आहोत. बागंलादेश संघाची भिस्त फिरकीपटूंच्या कामगिरीवर अवलंबून राहील.’’ आयर्लंडने या मैदानावर विंडीजविरुद्ध मिळविलेल्या विजयापासून प्रेरणा घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मोमसेन म्हणाला. बांगलादेशचा कर्णधार मशर्रफ मुर्तजा म्हणाला, ‘‘श्रीलंकेविरुद्ध ९२ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पुन्हा आत्मविश्वास मिळविण्यासाठी बुधवारी खेळल्या जाणारी लढत उपयुक्त ठरले. आम्हाला या लढतीत विजयाची आशा आहे.
(वृत्तसंस्था)
हेड टू हेड
बांगलादेश व स्कॉटलंड यांच्यात एकदिवसीय स्पर्धेत ३ लढती झाल्या आहेत. या तिन्ही लढती बांगलादेशने जिंकल्या आहेत.
वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघांमध्ये एकच सामना झाला असून यामध्ये बांगलादेशने स्कॉटलंडचा पराभव केला.
बांगलादेश : मशरफे मोर्ताझा (कर्णधार), अल आमीन हुसेन, अनामुल हक, अराफत सन्नी, महमुदुल्लाह, मोमिनुल हक, मुशफिकर रहिम (यष्टीरक्षक), नासीर हुसेन, रुबेल हुसेन, सब्बीर रहमान, शकिब अल हसन, सौम्या सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इकबाल, तस्कीन अहमद.
स्कॉटलंड : प्रेस्टन मोम्मसेन (कर्णधार), कायले कोएत्झर (उपकर्णधार), रिची बेरींग्टन, फ्रेडी कोलमन, मॅथ्यूज क्रॉस (यष्टीरक्षक), जोश डॅवेय, अलास्डेर एवान्स, हामिश गार्डीनेर, माजीद हक, मिचल लीस्क, मॅट मॅचान, कॅलूम मॅकलीओड, साफयान शरिफ,
रॉब टेलर, लेन वार्डलॉ.