‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा १४ मार्चपासून; साहसी खेळांचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 14:45 IST2022-03-02T14:44:39+5:302022-03-02T14:45:56+5:30
कोकणातील चिपळूणनजिकच्या डेरवण येथे ‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा १४ मार्चपासून; साहसी खेळांचाही समावेश
चिपळूण : कोकणातील चिपळूणनजिकच्या डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज् ट्रस्टच्या (एसव्हीजेसीटी) वतीने सलग आठव्या वर्षी ‘डेरवण यूथ गेम्स’ (डीवायजी) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त १४ ते २१ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या क्रीडा महोत्सवात विविध खेळांच्या स्पर्धा रंगतील. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर औरंगाबाद, नागपूर तसेच कोकणातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर खेळाडू या क्रीडा महोत्सवात सहभागी होत असतात.
एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, लंगडी, खो खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल हे खेळांचे अटीतटीचे सामने रंगतील. वॉल क्लाईम्बिंग या प्रकारातही साहसी खेळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत राज्यभरातील सुमारे सात हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पदकं, चषक तसेच एकूण १४ लाखांहून अधिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.
१२ मार्चपर्यंत प्रवेश नोंदणी सुरू राहणार असून ऑनलाइन नोंदणी www.svjctsportsacademy.com सुरू झाली आहे. नोंदणीकरीता ९८२२६३९३०६, ९८५०८८३२८३ या मोबाइलवर क्रमांकावरही संपर्क साधता येईल. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारांत ०८ वर्ष ते १८ वर्षे वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत.