दिल्लीचा सलग सातवा पराभव
By Admin | Updated: May 20, 2014 00:36 IST2014-05-20T00:36:33+5:302014-05-20T00:36:33+5:30
आयपीएलच्या सातव्या पर्वात गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला रोखण्यात तळाच्या स्थानावरील दिल्ली संघ अखेर अपयशीच ठरला

दिल्लीचा सलग सातवा पराभव
नवी दिल्ली : आयपीएलच्या सातव्या पर्वात गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला रोखण्यात तळाच्या स्थानावरील दिल्ली संघ अखेर अपयशीच ठरला. सोमवारी अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत पंजाब संघाने कामगिरीत सातत्य राखताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ४ गडी व २ चेंडू राखून पराभव केला आणि सातव्या पर्वात नववा विजय मिळवित प्लेआॅफमधील स्थान निश्चित केले. पंजाब संघाच्या विजयात मनन व्होरा व अक्षर पटेल यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरेडव्हिल्स डाव ७ बाद १६३ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १९.४ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवाग (२३) व मनन व्होरा (४२ धावा, १९ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार) यांनी सलामीला ६७ धावांची भागीदारी करीत पंजाब संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर अक्षर पटेलने नाबाद ४२ धावांची खेळी करीत पंजाब संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेरच्या षटकात पंजाब संघाला विजयासाठी ९ धावांची गरज होती. पार्नेलच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर ऋषी धवनने चौकार ठोकत संघाला विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. मॅक्सवेल (१४), वृद्धिमान साहा (१३) व जॉर्ज बेली (६) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. त्याआधी दिनेश कार्तिक (६९) व कर्णधार केव्हिन पीटरसन (४९ धावा, ३२ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारली. कार्तिकने ४४ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व ३ षटकारांच्या साह्याने ६९ धावा फटकाविल्या. कार्तिकने आयपीएलमधील २००० धावांचा पल्ला पूर्ण केला. त्याने पीटरसनसोबत दुसर्या विकेटसाठी ७१ धावांची तर जेपी ड्युमिनीसोबत (१७) तिसर्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. पंजाबतर्फे संदीप शर्मा व ब्युरेन हेन्ड्रिक्सने अनुक्रमे ३५ व ३६ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले. अक्षय पटेलने किफायती मारा करताना ४ षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. (वृत्तसंस्था)