देऊस एस्ता कोनोस्को..
By Admin | Updated: June 30, 2014 01:33 IST2014-06-30T01:33:56+5:302014-06-30T01:33:56+5:30
तुम्हाला जर ब्राझीलियन्स व्हायचं असेल तर तुम्हाला फुटबॉल खेळता आलं पाहिजे आणि हो, संगीताच्या तालावर डोलताही आलं पाहिजे..

देऊस एस्ता कोनोस्को..
>संदीप चव्हाण
रोटी कपडा और मकान.. मनोजकुमारचा गाजलेला सिनेमा.. जर मनोजकुमार ब्राझीलियन्स असता तर त्याला रोटी, फुटबॉल और डान्स असा सिनेमा बनवावा लागला असता.. ब्राझीलमध्ये अंगावर कपडे असलेच पाहिजे असा हट्ट नाही आणि मकान म्हणाल तर अथांग पसरलेला निळाशार समुद्र हाच जणू त्यांचा निवारा..
तुम्हाला जर ब्राझीलियन्स व्हायचं असेल तर तुम्हाला फुटबॉल खेळता आलं पाहिजे आणि हो, संगीताच्या तालावर डोलताही आलं पाहिजे.. ब्राझीलियन्स जेव्हा फुटबॉल खेळत नसतात, तेव्हा बहुधा नाचत असावेत इतका तो ताल त्यांच्या रक्तात भिनलाय. सॅल्व्हाडोरच्या फॅरोल द बारा या ऐतिहासिक लाईट हाऊसच्या येथे जेव्हा मी पोहोचलो, तेव्हा अवघं सॅल्वाडोर शहर तिथे भव्य स्क्रीनवर ब्राझील विरुद्ध चिलीची मॅच पाहायला लोटलं होतं. घडय़ाळ्याचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तसतसं डीजेच्या तालावर अवघा परिसर बेधुंद होत होता.. मधूनच येणारी पावसाची सर त्यांच्यासोबत जणू फेर धरत होती. खरंतर मॅचमध्ये 1-1 अशा बरोबरीची कोंडी काही केल्या फुटत नव्हती आणि तो क्षण आला.. चिलीच्या पिनिल्लानं एक्स्ट्रा टाईमच्या शेवटच्या काही मिनिटांत टोलवलेला चेंडू गोलपोस्टवर आदळून माघारी आला.. काळजाचा ठोका चुकावं तसं फॅरेल द बाराचा तो किनारा क्षणार्धात शांत झाला.. त्या शांततेलाही एक सूर होता.. आणि ब्राझील बचावल्याचं लक्षात येताच मग चोहीकडून एकच नाद घुमला- देऊस एस्ता कोनोस्को.. म्हणजेच देव आमच्या सोबत आहे.. खरंच ब्राझीलचं दैव बलवत्तर होतं.. मॅच टायब्रेकवर निकाली निघाली.. ब्राझील जिंकली आणि मग सॅल्व्हाडोरच्या त्या सागरी किना:यावर सुरू झाला तो ब्राझीलियन्स कार्निव्हल.. जर ब्राझील हरलं असतं तर.. विजयाचा जल्लोष करणारी ही फुटबॉलवेडी जनता पराभव पचवू शकली असती का? हा फुटबॉल वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी स्पर्धेच्या आयोजनाबाबत स्थानिक जनतेत प्रचंड रोष होता. हिंसक निदर्शनेसुद्धा झाली होती. ब्राझीलियन जनतेच्या मूलभूत गरजांएवेजी या खेळाच्या संयोजनावर झालेला वारेमाप खर्च अनावश्यक असल्याचं येथील जनतेचं म्हणणं.. पण वर्ल्डकप सुरू होताच या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. त्यात ब्राझीलची टीम चांगली कामगिरी करत असल्यामुळे तर संयोजकांनी नि:श्वास सोडला होता. अशा स्थितीत संघाचा पराभव पुन्हा या निदर्शनांना वाट मोकळा करून देणारा ठरला असता..
काही का असेना सॅल्व्हाडोरचा या लाईट हाऊसनं विजयाचा जल्लोष अनुभवला हे अंतिम सत्य.. याच लाईट हाऊसपासून काही सागरी मैल अंतरावर ब्राझीलच्या इतिहासातील सगळ्यात मोठी जहाज दुर्घटना झाली होती. 5 मे 1668 साली सॅक्रामेंटो नावाचं जहाज येथे बुडाले होते. जहाजावरील 400पैकी अवघी 7क् माणसंच वाचू शकली होती. अशा प्रकारच्या दुर्घटना टळाव्यात म्हणून मग त्याच वर्षी या लाईट हाऊसची नव्यानं उभारणी सुरू केली गेली. त्याच लाईट हाऊसजवळं उभं राहून ब्राझीलची डुबती नैया पार होताना मी पाहिली. त्या तमाम सॅल्व्हाडोरवासीयांच्या सुरात माझा सूर नकळत कधी मिसळला ते कळलं नाही.. बेभानपणो मीही ओरडत होतो- देऊस एस्ता कोनोस्को.. खरंच देव ब्राझीलियन्सच्या बाजूने होता..