‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी दालमिया निश्चित
By Admin | Updated: March 2, 2015 00:55 IST2015-03-02T00:55:24+5:302015-03-02T00:55:24+5:30
अनुभवी क्रिकेट प्रशासक जगमोहन दालमिया यांची एक दशकापेक्षा अधिक कालावधीनंतर पुन्हा ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी निवड होणार

‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी दालमिया निश्चित
चेन्नई : अनुभवी क्रिकेट प्रशासक जगमोहन दालमिया यांची एक दशकापेक्षा अधिक कालावधीनंतर पुन्हा ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. एन. श्रीनिवासन गटाने त्यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पसंती दर्शविली आहे. माजी अध्यक्ष शरद पवार यांना पूर्व विभागातून सूचक व अनुमोदक न मिळाल्यामुळे दालमिया यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘बीसीसीआय’चे विद्यमान सचिव संजय पटेल यांना पवार यांचे जवळचे मानले जाणारे अनुराग ठाकूर यांच्याकडून आव्हान मिळाले नाही, तर पटेल पुन्हा सचिवपदी कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले ७० वर्षीय दालमिया यांचा पूर्व विभागातील दोन मतांवर प्रभाव आहे. श्रीनिवासन यांच्या गटातील सदस्यांचे अन्य नावांवर एकमत न झाल्यामुळे दालमिया पुन्हा अध्यक्षपदाचे दावेदार ठरले आहेत.
पूर्व विभागातून पवार यांना अध्यक्षपदाच्या नामांकनासाठी सूचक न मिळाल्यामुळे दालमिया यांची उमेदवारी अधिक मजबूत झाली. पूर्व विभागातील सर्व सहा संघटनांचा श्रीनिवासन यांना पाठिंबा आहे. आज, सोमवारीच्या एजीएमपूर्वी श्रीनिवासन गटाची रविवारी बैठक झाली.