१३व्या डावापर्यंत सामना बरोबरीत चालला होता, १४ व्या डावात चार तास, ५८ चाली... डी गुकेश जिंकला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 07:56 IST2024-12-13T07:56:32+5:302024-12-13T07:56:51+5:30
१३व्या डावापर्यंत हा सामना बरोबरीत चालला होता. रोमहर्षक बनलेल्या १४व्या डावात गुकेशकडे लिरेनला पराभूत करून विश्वविजेता बनण्याची संधी होती.

१३व्या डावापर्यंत सामना बरोबरीत चालला होता, १४ व्या डावात चार तास, ५८ चाली... डी गुकेश जिंकला...
सिंगापूर : १८ वर्षांचा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने विश्व फिडे चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत गुरुवारी चीनचा ३२ वर्षांचा विश्वविजेता डिंग लिरेन याला शेवटच्या डावात पराभूत केले आणि सर्वांत युवा विश्व चॅम्पियन बनण्याचा मान पटकावला. १८वा विश्वविजेता म्हणून गुकेशचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.
विजेतेपदाबद्दल गुकेशला २५ लाख डॉलर्सचा पुरस्कार मिळाला. १३व्या डावापर्यंत हा सामना बरोबरीत चालला होता. रोमहर्षक बनलेल्या १४व्या डावात गुकेशकडे लिरेनला पराभूत करून विश्वविजेता बनण्याची संधी होती. गुकेशने आव्हान स्वीकारले आणि चार तासांत ५८व्या चालींनंतर ७.५ वि. ६.५ अशा फरकाने सामना जिंकला. २०१८ साली सलग १०८ दिवस न हरता खेळण्याचा पराक्रम लिरेनने केला होता. अशा मातब्बर खेळाडूवर मात करत गुकेशने विश्वस्तरावर नवी ओळख निर्माण केली.
गुकेशसाठी स्वप्नवत वर्ष
गुकेशसाठी हे वर्ष स्वप्नवत ठरले. त्याने सप्टेंबर २०२४ मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतासाठी पुरुष संघाचे सुवर्ण पदक जिंकले. याच स्पर्धेत नागपूरच्या दिव्या देशमुखचा समावेश असलेल्या भारताच्या महिला संघाने देखील सुवर्ण जिंकले होते. आता गुकेश वैयक्तिक विश्व विजेता बनला आहे.
वडीलांना जादू की झप्पी...
गुकेश विश्वविजेता बनताच बाहेर वाट पाहत असलेल्या त्याच्या वडिलांनी पहिल्यांदा त्याला मिठी मारली, यावेळी गुकेश अत्यंत भावूक झाला होता. .गुकेशची आतमध्ये मॅच सुरु असताना त्याचे वडील बाहेर उभे होते. यावेळी मोबाईलवर ते खेळाचा स्कोअर पाहत होते, यानंतर आपला मुलगा जिंकल्याचे लक्षात येताच ते थेट गुकेशला भेटण्यासाठी निघाले. यावेळी या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये वाटेत त्यांना इतर लोक अभिनंदन करण्यासाठी हात पुढे करत होते. परंतू विश्वविजेता ठरलेल्या मुलाला भेटण्यासाठी ते आतूर झाले होते त्यामुळे ते घाईघाईत त्याला भेटण्यासाठी जातानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. गुकेश बाहेर आला आणि वडिलांना कडकडून मिठी मारली. हा बाप-लेकामधील अत्यंत भावूक क्षण मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला.
पहिली लढत गुकेश पराभूत वि. लिरेन ०-१
दुसरी लढत गुकेश बरोबरी वि. लिरेन ०.५-१.५
तिसरी लढत गुकेश विजयी वि. लिरेन १.५-१.५
चौथी लढत गुकेश बरोबरी वि. लिरेन २-२
पाचवी लढत गुकेश बरोबरी वि. लिरेन २.५-२.५
सहावी लढत गुकेश बरोबरी वि. लिरेन ३-३
सातवी लढत गुकेश बरोबरी वि. लिरेन ३.५-३.५
आठवी लढत गुकेश बरोबरी वि. लिरेन ४-४
नववी लढत गुकेश बरोबरी वि. लिरेन ४.५-४.५
दहावी लढत गुकेश बरोबरी वि. लिरेन ५-५
अकरावी लढत गुकेश विजयी वि. लिरेन ५.५-५
बारावी लढत गुकेश पराभूत वि. लिरेन ५.५-५.५
तेरावी लढत गुकेश बरोबरी वि. लिरेन ६.५-६.५
चौदावी लढत गुकेश विजयी वि. लिरेन ७.५-६.५
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी
केले अभिनंदन
नवी दिल्ली : सर्वांत युवा विश्व चॅम्पियन बनल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी. गुकेशच्या कामगिरीचे कौतुक करीत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. गुकेशच्या जेतेपदामुळे त्याचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात अजरामर झालेच, शिवाय लाखो युवा खेळाडूंना स्वप्न जोपासण्याची आणि उत्कृष्ट बनण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
विश्व बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वांत कमी वयाचा बुद्धिबळपटू गुकेशचे हार्दिक अभिनंदन! गुकेश तू भारताचा गौरव वाढवला आहेस. तुझ्या जेतेपदामुळे बुद्धिबळातील महाशक्ती म्हणून भारताची ताकद अधिक भक्कम बनली आहे. फारच सुंदर गुकेश! प्रत्येक भारतीयाकडून मी तुझ्या गौरवशाली भविष्याबद्दल कामना करीत आहे.
- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
ऐतिहासिक आणि अनुकरणीय! डी. गुकेशचे या उल्लेखनीय कामगिरीसाठी अभिनंदन! हे त्याच्यातील अद्वितीय प्रतिभा, कठोर मेहनत आणि दृढनिश्चयाचे फळ आहे. त्याने स्वत:च्या कामगिरीमुळे लाखो युवा खेळाडूंना प्रेरित केेले आहे. उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा!
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान