ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - क्वार्टर फायनलमध्ये भारताने बांग्लादेशवर मात करत दिमाखात प्रवेश केला असला या सामन्यातील पंचाच्या चुकीच्या निर्णयावर आयसीसीचे अध्यक्ष व बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष मुस्तफा कमाल भलतेच नाराज झाले आहेत. वर्ल्ड कप भारताने जिंकावा यासाठीच हा कट रचला जात असून एकाच सामन्यात पंच डझनभऱ चुकीचे निर्णय देऊ शकत नाही असे मुस्तफा यांनी म्हटले आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही पंचांच्या निर्णयाविरोधात आयसीसीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारताला विजय मिळाला असला तरी या सामन्यात पंचांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले. रोहित शर्मा ९० धावांवर असताना फुलटॉस चेंडू टोलवण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला होता.मात्र पंचांनी तो नो बॉल ठरवले व रोहितला जीवदान मिळाले. यानंतर रोहितने आणखी ४७ धावा काढून भारताच्या डावाला आकार दिला. याशिवाय महमदुल्लाहचा शिखर धवनने सीमारेषेजवळ टिपलेला झेल वादग्रस्त ठरला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये पंचांनी चुकीचे निर्णय दिल्याने बांग्लादेश पराभूत झाल्याची बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींना वाटते. ढाकामध्ये सामन्यातील पंचांविरोधात निदर्शनंही करण्यात आली.
आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनीदेखील बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींच्या आरोपांशी सहमती दर्शवत आयसीसीवरच टीकास्त्र सोडले. मुस्तफा हे स्वतः गेल्या काही वर्षांपासून बांग्लादेश क्रिकेट बोर्डात सक्रीय आहेत. 'भारताने वर्ल्डकप जिंकावे यासाठी कट रचला जात आहे. क्रिकेटमध्ये पंचांकडूनही चुका होतात हे गृहीत धरले तरी एकाच सामन्यात पंचांनी १२ चुकीचे निर्णय देणे हे संशयास्पद वाटते' असे सूचक विधान मुस्तफा कमाल यांनी केले आहे. सामन्या दरम्यान स्टेडियमवरील मोठ्या स्क्रिनवर जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा असा संदेश झळकत होता. सामना सुरु असताना स्टेडियममधील मोठ्या स्क्रिनवर असे संदेश झळकणे हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन ठरते असे मुस्तफा कमाल यांनी म्हटले आहे. मी हा प्रकार आयसीसीच्या सीईओंच्या निदर्शनास आणून दिला, पण त्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. सामना सुरु होण्यापूर्वीच भारत जिंकणार हे बहुधा ठरले होते असे खोचक विधानही त्यांनी केले.
आयसीसीचे अध्यक्षपद हे केवळ मानाचे असून आयसीसीचे सर्वाधिकार चेअरमनकडे असतात. मुस्तफा कमाल हे अध्यक्ष असून एन. श्रीनिवासन हे आयसीसीचे चेअरमन आहेत. श्रीनिवासन यांची कोंडी करण्यासाठी कमाल यांनी हा आरोप केल्याची चर्चा आहे.