माझ्यावर दडपण होते : ख्रिस गेल
By Admin | Updated: February 25, 2015 01:24 IST2015-02-25T01:17:51+5:302015-02-25T01:24:38+5:30
जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने मंगळवारी विश्वकप स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत द्विशतकी खेळी केली.

माझ्यावर दडपण होते : ख्रिस गेल
कॅनबेरा : जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने मंगळवारी विश्वकप स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत द्विशतकी खेळी केली. माझ्यावर धावा काढण्याचे दडपण होते, अशी प्रतिक्रिया गेलने या विक्रमी खेळीनंतर दिली. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात गेलने वेगवान द्विशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. माझ्याकडून चाहत्यांना द्विशतकी खेळीची अपेक्षा होती आणि अखेर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला, असेही गेल म्हणाला.
गेल्या दोन वर्षांत निराशाजनक कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या गेलने २०१३ नंतर प्रथमच शतकाची वेस ओलांडली. गेल म्हणाला, ‘‘माझ्यावर धावा फटकाविण्याचे दडपण होते. कारकिर्दीत प्रथमच माझ्याकडून धावांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. टिष्ट्वटरवर सर्व चाहते मला धावा फटकाविण्यासाठी म्हणत होते. माझ्याकडून बऱ्याच चाहत्यांना चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरल्यामुळे समाधानी आहे. चार खेळाडूंचा नियम अस्तित्वात आल्यानंतर मी केवळ एकदा अर्धशतकी खेळी केली, पण आता मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला.’’
गेल विश्वकप स्पर्धेत द्विशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे; पण वन-डे क्रिकेटमध्ये यापूर्वी भारताच्या तीन फलंदाजांनी द्विशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे. त्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. रोहितने दोनदा असा पराक्रम केला आहे. आता वयाचा प्रभाव जाणवत असल्याचे ३५ वर्षीय गेलने कबूल केले. गेल म्हणाला, ‘‘अनेकदा चाहत्यांना कल्पना नसते, की खेळाडू कुठल्या परिस्थितीत आहे. मी दुखापतींनी त्रस्त होतो आणि वयाचाही प्रभाव जाणवत होता. मी या लढतीत जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर उभा राहण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीपूर्वी अशा प्रकारची खेळी करण्यास प्रयत्नशील होतो.’’