CoronaVirus: Strive for Olympic Qualification; Indian wrestling federation offers 'Narsingh', postponement benefit | CoronaVirus : ऑलिम्पिक पात्रतेसाठी प्रयत्न कर; भारतीय कुस्ती महासंघाची नरसिंगला ‘ऑफर’, स्थगितीचा फायदा

CoronaVirus : ऑलिम्पिक पात्रतेसाठी प्रयत्न कर; भारतीय कुस्ती महासंघाची नरसिंगला ‘ऑफर’, स्थगितीचा फायदा

नवी दिल्ली : चार वर्षांच्या बंदीचा सामना करणारा मल्ल नरसिंग पंचम यादव याने टोकियो आॅलिम्पिकच्या पात्रता फेरीचा प्रयत्न केल्यास भारतीय कुस्ती महासंघाने त्याला पाठिंबा देण्याचे ठरविले आहे.
आॅलिम्पिकचे आयोजन जुलै-आॅगस्टमध्ये झाले असते तर नरसिंगकडे पात्रता फेरीसाठी प्रयत्न करण्याची संधी नव्हती. कोरोना व्हायरसमुळे आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभर लांबणीवर पडले आहे. भारताने ७४ किलो वजन गटात अद्याप कोटा मिळविलेला नाही. अशावेळी नरसिंग या गटाची पात्रता चाचणी यशस्वी करून टोकियो आॅलिम्पिकसाठी प्रयत्न करू शकतो. त्याच्यावरील बंदी जुलैमध्ये संपणार आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये नरसिंगची लढत सुरू होण्याच्या काही तास आधी विश्व डोपिंग एजन्सीच्या अपिलावर सुनावणी झाली होती. त्यात नरसिंग डोपिंगमध्ये दोषी आढळताच आॅगस्ट २०१६ ला क्रीडा लवादाने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली होती.
कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर म्हणाले, ‘नरसिंगने कुस्ती महासंघाकडे आॅलिम्पिक पात्रता फेरीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यास आम्ही त्याला रोखणार नाही. त्याच्यावरील बंदी संपल्यानंतर तो पुनरागमन करून प्रयत्न करू शकतो.’ रिओ आॅलिम्पिकआधी डोप चाचणीत अपयशी ठरल्यामुळे नाडाने नरसिंगच्या पेय पदार्थात काही भेसळ झाल्याची कबुली दिली होती. त्याने आॅलिम्पिकची पात्रतादेखील गाठली होती, दुसरीकडे आॅलिम्पिक पात्रतेपासून वंचित राहिलेला दोन आॅलिम्पिक पदकांचा मानकरी सुशील कुमार याने ऐनवेळी चाचणीची मागणी करीत नरसिंगला न्यायालयात खेचले होते. नरसिंग डोप चाचणीत नाट्यमयरीत्या अपयशी ठरला. त्याच्यावर चार वर्षांच्या बंदीची देखील नामुष्की आली. नाडाने मान्य केले होते की, त्याच्या पेय पदार्थांमध्ये बंदी असलेले पदार्थ मिसळले होते. त्याने रियो आॅलिम्पिकसाठी पात्रता देखील मिळवली होती. (वृत्तसंस्था)

पुनरागमनासाठी तयार - नरसिंग यादव
टोकियो आॅलिम्पिक २०२१ स्थगित झाल्यानंतर नरसिंग पंचम यादव याच्या कारकिर्दीला जणु संजिवनीच मिळाली आहे. डोपिंगमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. नरसिंग याने मुंबईत सांगितले की, माझा नेहमीच विश्वस होता की मी काही चुकीचे केले नाही. विजय हा नेहमीच सत्याचा होतो. ईश्वराची कृपा आहे की मला अजून एक संधी मिळु शकते. मला वाटते की मी आॅलिम्पिक खेळु शकतो. मी पुनरागमनावर लक्ष केंद्रित करत आहे. मी टोकियोत पदक जिंकु शकतो.’ रियो आॅलिम्पिकच्या आधी डोप टेस्टमध्ये अपयशी ठरल्यावर नरसिंगवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

Web Title: CoronaVirus: Strive for Olympic Qualification; Indian wrestling federation offers 'Narsingh', postponement benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.