सातत्य, एकाग्रतेमुळे सुवर्ण जिंकलो!
By Admin | Updated: October 7, 2014 03:04 IST2014-10-07T03:04:09+5:302014-10-07T03:04:09+5:30
नेमबाज जीतू राय याच्यासाठी २०१४ हे वर्ष खास आहे. तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकाची लयलूट करणा-या जीतूने सोमवारी यशाचे रहस्य सांगितले.

सातत्य, एकाग्रतेमुळे सुवर्ण जिंकलो!
मुंबई : नेमबाज जीतू राय याच्यासाठी २०१४ हे वर्ष खास आहे. तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकाची लयलूट करणा-या जीतूने सोमवारी यशाचे रहस्य सांगितले. खेळातील सातत्य आणि एकाग्रता यामुळेच यश मिळवणे शक्य झाल्याचे तो म्हणाला. आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या (ओजीक्यू) वतीने मुंबईत आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओजीक्यूचा अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवूड स्टार सैफ अली खान याच्या नावाची घोषणा करण्यात आली.
इंचियोन येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध घेत जीतूने इतिहास घडविला. या यशामागे अथक परिश्रम, एकाग्रता आणि खेळाप्रती असलेले प्रेम यामुळेच ही यशाची भरारी घेणे शक्य झाल्याचे जीतूने सांगितले. पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा घोळका अवतीभवती पाहून काहीसा भारावलेला जीतू प्रत्येक प्रश्नाला स्मितहास्याने उत्तर देत होता. आशियाई स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सुवर्णपदक जिंकणे ही स्वप्नवत बाब असल्याचे सांगून तो म्हणाला, ‘दक्षिण कोरियात भारतीय ध्वज मोठ्या डौलाने फडकण्यास मी कारणीभूत ठरलो, याहून अभिमानाची बाब काहीच असू शकत नाही. नेमबाजीत सातत्य महत्त्वाचे असते. भारतीय लष्कराकडून मिळाल्याने हे सुवर्णपदक पटकावू शकलो.’
नेपाळमधील संखुआ सभा जिल्ह्यात जन्मलेल्या या खेळाडूला आता संपूर्ण भारत ओळखतो. मात्र हे खरे असले तरी आजही प्रत्येकाला स्वत:ची ओळख करून द्यावी लागते, याची त्याला खंत वाटते.