Commonwealth Games 2018 : महिला कुस्तीत विनेश फोगाटला सुवर्ण, भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 23 सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 13:52 IST2018-04-14T13:52:11+5:302018-04-14T13:52:11+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या खेळाची सुरूवात झाल्यापासून भारताने एकुण पाच सुवर्णपदकांवर नावं कोरलं आहे.

Commonwealth Games 2018 : महिला कुस्तीत विनेश फोगाटला सुवर्ण, भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 23 सुवर्ण
नवी दिल्ली - कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवार भारतीय खेळाडूंसाठी सुवर्ण दिवस ठरला आहे. आज भारतीय खेळाडूंनी 6 सुवर्ण पदकांसह एकूण 8 पदकांची कमाई केली आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने सुवर्ण पदक पटकावले आहे.
विनेश फोगाटने 50 किलो फ्रिस्टाईल कुस्तीत कॅनडाच्या जेसिकाला मात दिली. तर दुसरीकडे साक्षी मलिकने 62 किलो फ्रिस्टाईल कुस्तीत न्यूझीलंडच्या टायला फोर्डला पराभूत करत कांस्य पदक मिळवले. यासोबतच भारताला मिळालेल्या सुवर्ण पदकांची संख्या 23 झाली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत आजच्या दिवसाच्या खेळाची सुरूवात झाल्यापासून भारताने एकुण पाच सुवर्णपदकांवर नावं कोरलं आहे. पहिले बॉक्सिंगमध्ये मेरी कॉमने सुवर्णपदक पटकाविल्यानंतर आता नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंकी आणि कुस्तीपटू सुमित मलिकने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.
भारतीय नेमबाज संजीव राजपूतने पुरूषांच्या 50 मीटर 3 रायफल पोजिशनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. बॉक्सिंगप्रकारात गौरव सोळंकीने पुरूषांच्या 52 किलोवजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तर आयर्लंडचा ब्रेंडन इरविनचा पराभव करत गौरवने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. तर कुस्तीपटू सुमित मलिकने यशस्वी कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.