रंगतदार लढतीत बँगलोरची चेन्नईवर मात
By Admin | Updated: May 18, 2014 19:38 IST2014-05-18T19:29:55+5:302014-05-18T19:38:44+5:30
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रॉयल चॅलेंजर बँगलोर विरुध्द चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील लढतीत अखेर बँगलोरने बाजी मारली.
रंगतदार लढतीत बँगलोरची चेन्नईवर मात
ऑनलाइन टीम
रांची, दि. १८ - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रॉयल चॅलेंजर बँगलोर विरुध्द चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील लढतीत बँगलोरने बाजी मारली. रॉयल चेन्नई सुपरकिंग्जवर पाच गडी राखत दिमाखदार विजय मिळवला. चेन्नईने दिलेले १३८ धावांचे माफक आव्हान बँगलोरने पाच विकेटच्या मोबदल्यात १९.५ षटकांत गाठले. बँगलोरतर्फे ख्रिस गेलने सर्वाधिक ४६ धावा केल्या.
आयपीएलमध्ये रविवारी रांचीत रॉयल चँलेंजर बँगलोर विरुध्द चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना रंगला. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने प्रथम फलंदाजी केली. मात्र समाधानकारक सुरुवात करुनही चेन्नईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नईने चार विकेटच्या मोबदल्यात २० षटकांत फक्त १३८ धावांची मजल गाठली. रैनाने ४८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. मात्र रैनावगळता उर्वरित एकाही फलंदाजांला चमक दाखवता आली नाही.
चेन्नईने दिलेल्या १३८ धावांचे माफक लक्ष्य गाठताना रॉयल बँगलोरच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. आर.अश्विनच्या फिरकीने बँगलोरच्या फलंदाजांची भंबेरीच उडवली होती. अश्विनने चार षटकांत अवघ्या १६ धावा देत बँगलोरच्या दोन फलंदाजांनाही बाद केले. बँगलोरच्या वतीने ख्रिस गेलने ४६, एबी डिव्हीलियर्सने तुफानी २८ धावांची खेळी करुन विजयाच्या समीप नेले. शेवटच्या षटकात १० धावांची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूवर बँगलोरच्या फलंदाजांनी चौकार मारुन संघाला विजय मिळवून दिला.