सहकारी माझे स्वप्न पूर्ण करतील : नेयमार
By Admin | Updated: July 7, 2014 05:15 IST2014-07-07T05:15:13+5:302014-07-07T05:15:13+5:30
मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर पडलेला ब्राझीलचा सुपरस्टार नेयमार याचे आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देण्याचे मनसुबे अपुरे राहणार आहेत.

सहकारी माझे स्वप्न पूर्ण करतील : नेयमार
साओ पाऊलो : मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर पडलेला ब्राझीलचा सुपरस्टार नेयमार याचे आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देण्याचे मनसुबे अपुरे राहणार आहेत. असे असले तरी, ‘संघातील सहकारी माझे स्वप्न पूर्णत्वास नेतील,’ असा विश्वास त्याने आज, रविवारी व्यक्त केला.
यजमान संघाचा हा २२ वर्षीय फॉरवर्ड म्हणाला, ‘‘माझे स्वप्न भंगलेले नाही. हो, त्यात थोडा अडसर निर्माण झालाय. मात्र, हे चालायचेच. माझ्या स्वप्नाची पूर्तता होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझे संघसहकारी ब्राझीलला निश्चितपणे विश्वविजेतेपद मिळवून देतील. यासाठी आवश्यक ती क्षमता त्यांच्यात आहे आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपली संपूर्ण ताकद पणाला लावतील. अंतिम फेरीत खेळण्याची माझी खूप इच्छा होती, पण आता हे अशक्य आहे. मात्र, माझे सहकारी विश्वविजेते बनणार आहेत. मी त्यांच्यासोबत आहे. आम्ही सर्व ब्राझीलवासी विश्वविजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यास उत्सुक आहोत.’’
मंगळवारी जर्मनीविरुद्ध होणाऱ्या उपांत्य सामन्यात नेयमार प्रेक्षक म्हणूनही उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. ‘‘पाठीला त्रास झाला नाही, तरच तो सामन्याला उपस्थित राहू शकेल. त्याच्या प्रकृतीबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. ६-७ आठवड्यांत नेयमार पूर्णपणे तंदुरूस्त होईल,’’ असे ब्राझील संघाचे डॉक्टर जोस लुईस रँको यांनी सांगितले.