अॅशेसनंतर क्लार्क निवृत्त
By Admin | Updated: August 9, 2015 01:05 IST2015-08-09T01:05:26+5:302015-08-09T01:05:26+5:30
दुखापतीमुळे त्रस्त असलेला आणि सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेला आॅस्ट्रेलियाचा प्रेरणादायी कर्णधार मायकल क्लार्कने आज परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध

अॅशेसनंतर क्लार्क निवृत्त
नॉटिंगहॅम : दुखापतीमुळे त्रस्त असलेला आणि सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेला आॅस्ट्रेलियाचा प्रेरणादायी कर्णधार मायकल क्लार्कने आज परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध पाचव्या व अखेरच्या अॅशेस कसोटी सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याची घोषणा केली.
कारकिर्दीदरम्यान पाठ व टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या ३४ वर्षीय क्लार्कने वन-डे आंतरराष्ट्रीय व टी-२० क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.
आज चौथ्या अॅशेस कसोटीमध्ये इंग्लंडविरुद्ध आॅस्ट्रेलियाला १ डाव व ७८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर प्रतिक्रिया देताना क्लार्क म्हणाला, ‘‘माझ्याकडे अद्याप एक कसोटी सामना शिल्लक आहे. त्यानंतर माझी कारकीर्द संपणार आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे.’’
आजच्या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आणि पुन्हा एकदा अॅशेस करंडकावर नाव कोरले. पाचवा व अखेरचा कसोटी सामना २० आॅगस्टपासून ओव्हलमध्ये खेळला जाणार असून, हा क्लार्कचा कारकिर्दीतील ११५वा कसोटी सामना राहील.
पुरस्कार वितरण समारंभात भावुक झालेला क्लार्क म्हणाला, ‘‘मी ओव्हलमध्ये अंतिम कसोटी सामना खेळण्यास इच्छुक आहे. हा माझ्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना असेल. कोणीही सोडून जाण्यास उत्सुक नसतो, पण गेल्या १२ महिन्यांतील माझी कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.’’
सन २०११मध्ये रिकी पॉन्टिगच्या स्थानी संघाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या क्लार्कला गेल्या सहा कसोटी सामन्यांत एकदाही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. क्लार्कसाठी ही निराशाजनक कामगिरी आहे. क्लार्कने कर्णधार म्हणून पहिल्या ३० सामन्यांत १२ शतके ठोकली होती. याव्यतिरिक्त परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे क्लार्क निराश झाला आहे. त्यातील दोन पराभव तीन दिवसांमध्ये पत्करावे लागले.
कारकिर्दीत २८ शतके ठोकणारा क्लार्क म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेटला अॅशेसची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केला, पण आमचा निभाव लागला नाही.
आता पुढच्या पिढीची वेळ आहे.’’(वृत्तसंस्था)
मी काल मैदानावरून परतताना निवृत्तीचा निर्णय घेतला. माझ्या सहकाऱ्यांना याचे आश्चर्य वाटतेय. मी आताच निवृत्ती स्वीकारेन, याची त्यांनी कल्पना केली नव्हती. माझे जे काही आहे ते सर्व क्रि केटचे आहे. या खेळाच्या असंख्य आठवणी माझ्यासोबत असतील. मी खेळाडूंचा उत्साह वाढविण्यास इच्छुक आहे. ही योग्य वेळ असून, मायक्रोफोनवर आपणासोबत समालोचन कक्षात स्थान मिळेल, अशी आशा आहे.
- मायकल क्लार्क