ख्रिस गेलचा झंझावात, वर्ल्डकपमध्ये ठोकले द्विशतक
By Admin | Updated: February 24, 2015 13:15 IST2015-02-24T12:24:48+5:302015-02-24T13:15:56+5:30
झिम्बाब्वेच्या गोलदाजांची यथेच्छ धुलाई करत वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलने वर्ल्डकपमध्ये द्विशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे.

ख्रिस गेलचा झंझावात, वर्ल्डकपमध्ये ठोकले द्विशतक
ऑनलाइन लोकमत
कॅनबेरा, दि. २४ - झिम्बाब्वेच्या गोलदाजांची यथेच्छ धुलाई करत वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलने वर्ल्डकपमध्ये द्विशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. ख्रिस गेलने १४७ चेंडूत १० चौकार, १६ षटकार ठोकून २१५धाव्या केल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये द्विशतक ठोकणारा गेल हा पहिलाच फलंदाज आहे.
वर्ल्डकपमध्ये मंगळवारी कॅनबेरा येथे वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. आजचा सामना हा झिम्बाब्वे गोलदांजासाठी कटू आठवणी देणारा सामना ठरला. पहिल्याच षटकातील दुस-या चेंडूवर ड्वॅन स्मिथ भोपळा न फोडताच तंबूत परतला होता. विंडीजचा सलामावीर ख्रिस गेल हा स्फोटक फलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवत झिम्बाब्वेच्या गोलदांजांची अक्षरशः धुलाई केली. गेलच्या तडाखेबाज फटकेबाजी आणि त्याला मार्लोन सॅम्यूअल्सने दिलेली मोलाची साथ या आधारे वेस्ट इंडिजने दोन गडी गमावत ५० षटकांत ३७२ धावा केल्या. शेवटच्या चेडूंवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात गेल बाद झाला. तर मार्लोन सॅम्यूअल्स १३३ धावांवर नाबाद राहिला. दुस-या विकेटसाठी गेल व सॅम्यूअल्स या जोडीने ३७२ धावांची भागीदारी केली. वन डे सामन्यातील ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी १९९९ मध्ये भारताचा फलंदाज राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या जोडीने न्यूझीलंडविरोधात दुस-या विकेटसाठी ३३१ धावांची भागीदारी केली होती.
आजच्या दिवसाचा योगायोग म्हणजे पाच वर्षांपूर्वी २४ फेब्रुवारी रोजीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरोधात वन डे सामन्यातील पहिले द्विशतक ठोकले होते. वन डेत एका इनिंगमध्ये सर्वाधिक करणा-या फलंदाजाच्या यादीत गेल तिस-या स्थानावर आहे. विशेष म्हणजे यातील पहिल्या पाच पैकी चार फलंदाज हे भारतीय आहेत.
गेलने आज केलेले विक्रम
> वन डे सामन्यात ९ हजार धावा करणारा गेल हा जगातील १६ वा तर वेस्ट इंडिजचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
> ख्रिस गेलने आजच्या सामन्यात १६ षटकार ठोकून आंतरराष्ट्रीय पातळीवर ४०० षटकारांचा टप्पा ओलांडला. गेलने वन डेत २२९, कसोटीत ९८ आणि टी २० त ८७ षटकार ठोकले आहेत. या यादीत गेल दुस-या स्थानावर असून शाहिद आफ्रिदी (४४७ षटकार) पहिल्या क्रमांकावर आहे.
> कसोटीत त्रिशतक, वन डे द्विशतक आणि टी २० मध्ये शतक असा अनोखा विक्रम करणारा ख्रिस गेल हा पहिला फलंदाज आहे.