पाकसमोर ‘चोकर्स’चे तगडे आव्हान
By Admin | Updated: March 7, 2015 01:50 IST2015-03-07T01:50:03+5:302015-03-07T01:50:03+5:30
विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात सलामीच्या दोन सामन्यांत भारत व वेस्ट इंडीज विरुध्द पराभव पत्करलेल्या पाकिस्तानने झिम्बाब्वे आणि यूएईला नमवत आपली गाडी विजयी ट्रॅकवर आणली.

पाकसमोर ‘चोकर्स’चे तगडे आव्हान
आॅकलंड : विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात सलामीच्या दोन सामन्यांत भारत व वेस्ट इंडीज विरुध्द पराभव पत्करलेल्या पाकिस्तानने झिम्बाब्वे आणि यूएईला नमवत आपली गाडी विजयी ट्रॅकवर आणली. मात्र आता शनिवारी आॅकलंडला त्यांची गाठ पडणार ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी.
यंदाच्या स्पर्धेत फलंदाजीच्या समस्येशी झुंजणाऱ्या पाकिस्तानचा निभाव तुफान द. आफ्रिके विरुध्द कसा लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याचवेळी आफ्रिकेचे डेल स्टेन, मॉर्नी मॉर्कल यांसारखे भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजांसमोर पाक फलंदाजीची खरी कसोटी लागेल. प्रत्येक सामन्यात पाकिस्तानची आघाडीची फळीने कच खाल्ली आहे. त्यानंतर कर्णधार मिसबाह उल हक आणि गोलंदाजांनी संघाची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे आफ्रिकेसारख्या तगड्या संघासमोर पाकची आघाडीची फळी फॉर्ममध्ये येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आफ्रिकेविरुध्द विजय मिळवण्यासाठी कोणा एकावर अवलंबून न राहता सांघिक कामगिरीची पाकला गरज आहे.
गोलंदाजीचा विचार केल्यास पाकिस्तानची बाजू त्यातला त्यात समाधानकारक आहे. डावखुरे अव्वल मध्यमगती गोलंदाज जबरदस्त आक्रमतेने मारा करीत असले तरी त्यांचे पहिले लक्ष्य हे तुफान फॉर्ममध्ये असलेल्या धडाकेबाज एबी डीव्हीलियर्सला रोखण्याचेच असेल.
दुसऱ्या बाजूला भारताविरुध्द झालेल्या निराशाजनक पराभवाने खडबडून जागे झालेल्या दक्षिण आफ्रिकेने सलग दोन सामन्यांत ४०० धावांचा डोंगर उभारुन इतर संघांना धोक्याच्या इशारा दिला आहे. शिवाय हाशीम आमला, एबी डिव्हीलियर्स, फाफ डू प्लेसीस यांसारखे हुकमी फलंदाज देखील पुर्ण फॉर्ममध्ये असल्याने पाक समोरील अडचणी वाढल्या आहेत. पाकला नमवून बाद फेरी गाठण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्याचे लक्ष्य आफ्रिकेने बाळगले आहे. त्याचवेळी धावांचा पाठलाग करताना त्यांना पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
माझ्यामते संघाची चांगल्या प्रकारे कामगिरी होत आहे. स्पर्धेच्या निराशाजनक सुरुवातीनंतर आम्ही सावरलो आणि यानंतर स्पर्धेत आमची कामगिरी शानदार झाली आहे.
- डेल स्टेन,
वेगवान गोलंदाज, दक्षिण आफ्रिका
सर्वांचे लक्ष आमच्या कामगिरीवर लागले आहे. स्पर्धेत आगेकुच करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना असल्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही पुर्ण पणे सज्ज असून या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु.
- मिसबाह-उल-हक,
कर्णधार पाकिस्तान
पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहजाद, एहसान अदील, हॅरिस सोहेल, मोहम्मद हाफिज, मोहम्मद इरफान, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शाहिद आफ्रिदी, शोएब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल (यष्टीरक्षक), बाहब रिआज, यासीर शाह, युनिस खान.
दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला (उपकर्णधार), कायले अॅबॉट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जीन पॉल डुमीनी, फा डू प्लेसिस, इमरान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वॅन पार्नेल, अॅरोन फंगिसो, वेर्नोन फिलेंडर, रिली रोसोवू, डेल स्टेन.