Chinki Yadav earns 11th Olympic quota for India | चिंकी यादवने भारतासाठी मिळवला अकरावा ऑलिम्पिक कोटा
चिंकी यादवने भारतासाठी मिळवला अकरावा ऑलिम्पिक कोटा

दोघा : चिंकी यादवने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या २५ मीटर पिस्तूल पात्रता फेरीत ५८८ गुणांचा वेध घेत अंतिम फेरी गाठली. यासह तिने आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी अकरावा कोटा मिळवला. मात्र यानंतर तिला अंतिम फेरीत लय कायम राखण्यात अपयश आल्याने सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.

चिंकीने राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक, तर ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेले आहे. पात्रता फेरीत जबरदस्त कामगिरी केलेल्या चिंकीकडून भारताला मोठ्या आशा होत्या. मात्र आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत तिला ११६ गुणांसह सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत चिंकीने सर्वांचे लक्ष वेधताना ‘परफेक्ट १००’ गुणही मिळविले. या वेळी थायलंडची नेपहासवान यांगपाइबून (५९०) अव्वल राहिली आणि दुसऱ्या क्रमांकासह चिंकीने अंतिम फेरीत कूच केले.
या स्पर्धेनंतर चिंकीने म्हटले, ‘मी माझ्या कामगिरीवर किती आनंदी आहे हे शब्दांत सांगू शकत नाही. ही माझी सर्वोत्तम कामगिरी होती. माझे प्रशिक्षक, खासकरून जसपाल सर यांना माझ्या यशाचे श्रेय देते. तसेच, भोपाळ अकादमी व एनआरएआय यांचा पाठिंबाही माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला.’ दरम्यान अंतिम फेरीसह चिंकीने भारताचा आॅलिम्पिक कोटाही निश्चित केला. कारण या वेळी आठपैकी चार खेळाडूंनी आधीच आॅलिम्पिक कोटा मिळविलेला होता. त्यामुळे या स्पर्धेत केवळ चार आॅलिम्पिक कोटा शिल्लक राहिले होते. त्याचवेळी २५ मीटर पिस्तूल प्रकारातील भारताचे हे दुसरे आॅलिम्पिक कोटा ठरले. याआधी महाराष्ट्राच्या राही सरनोबतने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या म्युनिच विश्वचषक स्पर्धेत आॅलिम्पिक कोटा मिळवला होता. त्याचप्रमाणे, या स्पर्धेत सहभागी झालेले अन्य भारतीय नेमबाज अनुराज सिंग (५७५), नीरज कौर (५७२) यांना अनुक्रमे २१व्या आणि २७व्या स्थानी समाधान मानावे लागले. आतापर्यंत भारताने ५० मीटर रायफल (पुरुष-महिला), ५० मीटर रायफल थ्री पोजीशन (पुरुष), १० मीटर एअर रायफल (पुरुष-महिला) आणि २५ मीटर एअर पिस्तूल (महिला) या स्पर्धांमध्ये आॅलिम्पिक कोटा मिळवलेला आहे. (वृत्तसंस्था)
 

Web Title:  Chinki Yadav earns 11th Olympic quota for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.