छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 02:52 PM2024-02-29T14:52:57+5:302024-02-29T14:53:17+5:30

ठाणे -  मुंबई शहर यांनी पुरुष गटात, तर मुंबई उपनगरने महिला गटात "२२व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक" कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले.

Chhatrapati Shivaji Maharaj Cup Kabaddi Tournament: Mumbai City win Men's team title & Mumbai Suburban Women's team title | छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य

ठाणे -  मुंबई शहर यांनी पुरुष गटात, तर मुंबई उपनगरने महिला गटात "२२व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक" कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. मुंबई शहरचा प्रणव राणे आणि मुंबई उपनगरची हरजित संधू  हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने मुंबई शहरला ३८-३७ असे पराभूत करून पाच लाख रुपयांच्या बक्षीसासह "छत्रपती शिवाजी महाराज चषक" ऊंचावला. उपविजेत्या मुंबईला तीन लाखांचा घनादेश दिला गेला.


दोन्ही संघानी सावध सुरुवात केली. मुंबई शहरने ६व्या मिनिटाला पहिला लोण देत १४-०५ अशी आघाडी घेतली. पण त्याला प्रतिउत्तर देत मध्यांतरापूर्वी काही सेकंद आधी उपनगरने लोणची परतफेड करीत हीआघाडी २ गुणांवर आणली. मध्यांतराला मुंबई शहरकडे २०-१८ अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर उपनगरने आपला खेळ गतिमान करीत मुंबई वर लोण देत २७-२१ अशी आघाडी घेतली. मुंबईने देखील तोडीस तोड खेळ करीत ३६-३६ अशी बरोबरी साधली. शेवटच्या मिनिटात ३६-३५ अशी आघाडी मुंबईकडे होती. सामन्याची शेवटची चढाई मुंबईच्या पूजा यादवने केली. त्यावेळी उपनगराच्या सायली जाधवने तिची अव्वल पकड केली आणि उपनगरने मुंबईच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पूजाच्या या पकडिने मुंबई शहरचे विजयाचे स्वप्न भंग केले.


मुंबई उपनगरने या सामन्यात २८ झटापटीचे गुण, लोणचे ४ गुण, दोन अव्वल पकड करीत ४गुण तर २ बोनस गुण असे ३८ गुण मिळविले. हरजित संधूच्या झंझावाती चढाया तिला प्रणाली नागदेवता, सायली जाधव यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे उपनगरला आपला विजय साकारला आला. मुंबई शहरने या सामन्यात झटापटीचे २५ गुण, बोनसचे १०गुण, १लोण देत २गुण असे ३७ गुण मिळविले. अपेक्षा टाकले, पूजा यादव, प्रतीक्षा तांडेल यांचा खेळ मुंबईचा पराभव टाळण्यास अगदी थोडासा कमी पडला. 


पुरुषांच्या अंतिम सामन्यात मात्र मुंबई शहरने पुण्याचे आव्हान ३४-२७ असे मोडून काढले. मुंबईने पहिली पकड करीत गुणांचे खाते खोलले. पूर्वार्धात लोण देऊन देखील मुंबईकडे १३-११ अशी नाममात्र आघाडी होती. उत्तरार्धात दुसरा लोण देत मुंबईने २८-२० अशी आपली आघाडी वाढविली. शेवटी ७ गुणांच्या फरकाने त्यांनी विजय साकारला. मुंबईने या सामन्यात झटापटीचे २९ गुण, २ लोण देत ४गुण, बोनस करत १गुण असे ३४गुण मिळविले. प्रणय राणे, राज आचार्य यांच्या संयमी चढाया, त्याला सिद्धेश तटकरे, साहिल राणे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. पुण्याने झटापटीचे १५गुण, बोनस करीत १०गुण, अव्वल पकड करीत २गुण असे २७ गुण मिळविले. अजित चौहान, सुनील दुबीले, सुरेश जाधव, ऋषिकेश भोजने यांचा चढाई पकडीचा खेळ पुण्याचा पराभव टाळू शकला नाही.  

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Cup Kabaddi Tournament: Mumbai City win Men's team title & Mumbai Suburban Women's team title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.