बुद्धिबळाच्या 'राजा'चे जल्लोषात स्वागत; विश्वविजेत्या गुकेशची एक झलक पाहण्यासाठी चेन्नईत गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:14 IST2024-12-17T11:13:23+5:302024-12-17T11:14:34+5:30

तामिळनाडू राज्य सरकार आणि राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अधिकाऱ्यांनी गुकेशचे जल्लोषात स्वागत केले.

cheers crowds gather in chennai to catch a glimpse of world champion d gukesh | बुद्धिबळाच्या 'राजा'चे जल्लोषात स्वागत; विश्वविजेत्या गुकेशची एक झलक पाहण्यासाठी चेन्नईत गर्दी

बुद्धिबळाच्या 'राजा'चे जल्लोषात स्वागत; विश्वविजेत्या गुकेशची एक झलक पाहण्यासाठी चेन्नईत गर्दी

चेन्नई : विश्वविजेता बुद्धिबळपटू डोम्माराजू गुकेश याचे सोमवारी (दि. १६) चेन्नईमध्ये जोरदार स्वागत झाले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या चाहत्यांसह तामिळनाडू राज्य सरकार आणि राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अधिकाऱ्यांनी गुकेशचे जल्लोषात स्वागत केले.

१८ वर्षीय गुकेशने गेल्या आठवड्यात सिंगापूर येथे चीनच्या डिंग लिरेनला नमवून सर्वांत कमी वयाचा विश्वविजेता म्हणून मान मिळवला. त्याने यासह दीर्घकाळापासून सुरू राहिलेला रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह यांचा विश्वविक्रमही मोडला. कास्पारोव्ह यांनी १९८५ मध्ये वयाच्या २२व्या वर्षी विश्वविजेतेपद पटकावले होते. मायदेशी परतल्यानंतर गुकेशने आपल्या पाठीराख्यांचे आभार मानले. चेन्नई विमानतळावर प्रसारमाध्यमांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या चाहत्यांमध्ये गुकेशची एक झलक पाहण्यासाठी जबरदस्त चढाओढ रंगली होती.

जल्लोषात झालेल्या स्वागताविषयी गुकेश म्हणाला की, 'हे शानदार आहे. या अभूतपूर्व पाठिंब्याने मला ऊर्जा मिळाली. जागतिक अजिंक्यपद मिळवणे शानदार अनुभव आहे. भारतात ही ट्रॉफी पुन्हा आणणे खूप महत्त्वाचे आहे. या स्वागतासाठी सर्वांचे धन्यवाद.

मला आशा आहे की, पुढील काही दिवसांमध्ये आपण एकत्रितपणे जल्लोष करत चांगला वेळ व्यतीत करू'. चेन्नई विमानतळावर तामिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह गुकेशची शाळा वेलाम्मल विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी गुकेशला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. गुकेशने आपल्या शाळेतूनच बुद्धिबळाच्या स्वप्नवत प्रवासाची सुरुवात केली होती.

गुकेशपुढे आता कार्लसनचे आव्हान

युवा विश्व चॅम्पियन डोम्माराजू गुकेश याची पुढील लढत २०२५ ला नॉर्वे बुद्धिबळात नंबर वन मॅग्नस कार्लसनविरुद्ध होईल. २६ मे ते ६ जून या कालावधीत ही लढत होणार आहे. १८ वर्षांच्या गुकेशने यंदा टाटा स्टील मास्टर्स जिंकल्यानंतर बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्ण जिंकून दिले. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचेही जेतेपद पटकाविले शिवाय नुकताच सिंगापूर येथे विश्वविजेता होण्याचा मान मिळविला. जगातील सर्वांत बलाढ्य खेळाडूंपैकी एक कार्लसन याच्याविरुद्ध नॉर्वेत खेळण्यास आपण उत्सुक असल्याचे गुकेशने सांगितले. मागच्या वर्षी गुकेश येथे तिसऱ्या स्थानावर राहिला. यंदा विश्व चॅम्पियन या नात्याने कार्लसनला त्याच्या घरी आव्हान देणार आहे. नॉर्वे बुद्धिबळाची लढत सहा-सहा पुरुष आणि महिलांमध्ये दुहेरी राउंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल.

मानसिक दडपण झुगारणे महत्त्वपूर्ण 

जागतिक अजिंक्यपद केवळ बुद्धिबळातील चालींपुरते मर्यादित नाही. यासाठी मानसिक आणि भावनिक दडपणाचा यशस्वीपणे सामना करणे महत्त्वपूर्ण ठरते. यासाठी प्रशिक्षक पेंडी अष्टन यांनी खूप मदत केली. मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ज्या काही सूचना केल्या, त्या खेळाडू म्हणून माझ्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या. - डी. गुकेश, विश्वविजेता बुद्धिबळपटू

 

Web Title: cheers crowds gather in chennai to catch a glimpse of world champion d gukesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.