कॅरम : गिरीष तांबे व निलम घोडके अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:42 PM2020-02-17T20:42:53+5:302020-02-17T20:43:38+5:30

महिला एकेरी गटात विजेती जैन इरिगेशच्या निलम घोडकेला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपविजेती जैन इरिगेशनच्याच मिताली पिंपळेला चषक व प्रमाणपत्र यावर समाधान मानावे लागले.

Carrom: Girish tambe and nilam ghodake won title | कॅरम : गिरीष तांबे व निलम घोडके अजिंक्य

कॅरम : गिरीष तांबे व निलम घोडके अजिंक्य

Next

मुंबई : बॉम्बे वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या पुरुष ऐकरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दुसरा मानांकित गिरीष तांबे व जैन इरिगेशनची अग्रमानांकित निलम घोडके यांनी विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यामाने वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे वाय. एम. सी. ए. चे कार्याध्यक्ष श्री. शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सेबॅस्टीयन, सरचिटणीस श्री. पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय. एम. सी. ए. चे चिटणीस श्री. भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सहकार्य लाभले. या स्पर्धेला २०० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गिरीष तांबेने रंगतदार व रोमहर्षक अटीतटीच्या लढतीत बिगरमानांकित एअर इंडियाच्या झैद अहमदचा २५-९, ९-२५, २५-१५ अशी कडवी झुंज मोडीत काढून पहिल्या विजेतेपदाचा मानकरी ठरला व चषक पटकाविला. उपविजेता एअर इंडियाच्या झैद अहमदला चषक देऊन गौरविण्यात आले. पहिल्या गेममध्ये गिरीष तांबेने बचावात्मक व आक्रमक खेळाचे मिश्रण करत ६ व्या बोर्डपर्यंत १३-३ अशी आघाडी घेतली. नंतर सातव्या आणि आठव्या बोर्डमध्ये ५ आणि ७ गुण मिळवून २५-९ असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये एअर इंडियाच्या झैद अहमदने शांत चित्ताने बचावात्मक खेळ करत पाच बोर्डापर्यंत १४-१ अशी आघाडी घेतली. नंतरच्या तीन बोर्डात ८ गुण मिळवून सुद्धा गिरीष तांबे ९-२५ असा हरला व झैद अहमदने १-१ ने बरोबरी केली. नंतरच्या निर्णायक तिसऱ्या गेममध्ये आत्मविश्वास उंचावलेल्या झैद अहमदने चवथ्या बोर्डापर्यंत ५-११ असा पिछाडीवर होता. पाचव्या बोर्डमध्ये झैदने ब्रेक टू फिनिश नोंदवित १५-११ असा स्कोअर केला. नंतरचे तिन्ही बोर्ड गिरीष तांबे बचावात्मक खेळ करत १-१-४ असा गुण मिळवून २५-१५ असा तिसरा गेम जिंकून बॉम्बे वायएमसीए मुंबई जिल्हा गुणांकन कॅरम स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गिरीष तांबेने रोमहर्षक दोन गेम रंगलेल्या लढतीत जागतिक विजेता व नुकत्याच जळगाव येथे झालेला राष्ट्रीय विजेता रिझर्व्ह बॅंकेच्या प्रशांत मोरेचा २५-१७, २५-१६ असा पराभव करून स्पर्धेत मोठीच खळबळ माजवत दुसऱ्या गेममध्ये ब्रेक टू फिनिश करण्याचा मान मिळविला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एअर इंडियाच्या झैद अहमदने अटीतटीच्या दोन गेम रंगलेल्या लढतीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारिया विरुद्ध २५-१६, २५-१७ असा जिंकून अंतीम फेरी गाठली. 

महिला एकेरी गटात विजेती जैन इरिगेशच्या निलम घोडकेला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपविजेती जैन इरिगेशनच्याच मिताली पिंपळेला चषक व प्रमाणपत्र यावर समाधान मानावे लागले.

सात दिवस खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत १२ ब्रेक टू फिनिश आणि ५ ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली.

Web Title: Carrom: Girish tambe and nilam ghodake won title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई