मुंबईसमोर कोलकाताचे ‘गंभीर’ आव्हान

By Admin | Updated: May 14, 2014 02:29 IST2014-05-14T02:29:26+5:302014-05-14T02:29:26+5:30

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याला उशिरा का होईना सूर गवसला आहे. याच कामगिरीत सातत्य राहिल्यास बुधवारी मुंबई इंडियन्सला ‘गंभीर’ आव्हानाचा सामना करावा लागेल.

Calcutta's 'serious' challenge before Mumbai | मुंबईसमोर कोलकाताचे ‘गंभीर’ आव्हान

मुंबईसमोर कोलकाताचे ‘गंभीर’ आव्हान

कटक : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याला उशिरा का होईना सूर गवसला आहे. याच कामगिरीत सातत्य राहिल्यास बुधवारी मुंबई इंडियन्सला ‘गंभीर’ आव्हानाचा सामना करावा लागेल. दोन्ही संघ आयपीएलमध्ये आपले आव्हान टिकवण्यासाठी धडपडत आहेत. दुबईत झालेल्या पाचही लढतींत पराभव पत्करणार्‍या मुंबईने मायदेशी परतताच विजयी ट्रॅक पकडला आणि चारपैकी तीन लढतींत त्यांनी विजय साजरा केला. मुंबईने गत लढतीत सनरायझर्स हैदराबादवर सात विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला होता. याच विजयीरथावर अखेरपर्यंत स्वार राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुंबईला कोलकाताचे आव्हान यशस्वीरीत्या पेलावेच लागेल. स्पर्धेत आपले स्थान अबाधित राखण्यासाठी मुंबईला उर्वरित सर्व लढतींत विजय आवश्यकच आहे. त्यात हैदराबादवरील विजयाने त्यांचे मनोबल उंचावले आहे. मुंबईने ९ सामन्यांत तीन विजय मिळवत सहा गुणांसह गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने चार विजय मिळवत आठ गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. एक विजय आणि कोलकाताचा प्ले आॅफमध्ये धडक मारण्याचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे तेही या लढतीत संपूर्ण ताकदिने उतरतील. दोन्ही संघ गत लढतीत विजय मिळवून बुधवारी मैदानात उतरतील. कोलकाताने पंजाबसारख्या तगड्या संघावर ९ विकेट्सने साजरा केलेला विजय त्यांच्यासाठी खूप विशेष होता. रॉबीन उथप्पा, गंभीर आणि मनीष पांडे यांच्या फटकेबाजीने पंजाबची हवाच निघाली होती. सुरुवातीला विस्कळीत वाटलेला हा संघ आता कुठे व्यवस्थित आल्यासारखा दिसत आहे. या तिन्ही खेळाडूंवर कोलकाताची मदार आहे. गोलंदाजीत मोर्ने मॉर्केल, उमेश यादव आणि जॅक कॅलिससह सुनील नरिन व पियुष चावलावर भिस्त आहे. दुसरीकडे मुंबईसाठी सलामीवीर लेंडन सिमन्स हा दूत बनून आला आहे. जलज सक्सेनाच्या जागी सिमन्सने मुंबई संघात एन्ट्री केली. त्याने हैदराबादविरुद्ध केलेली ६८ धावांची खेळी ही विजयात महत्त्वाची ठरली. (वृत्तसंस्था) त्याच्याबरोबर रोहित शर्मा, अंबाती रायडू, किरॉन पोलार्ड हे कोलकाताची डोकेदुखी बनू शकतात. गोलंदाजीत मात्र मुंबईची बाजू कमकुवत आहे.

Web Title: Calcutta's 'serious' challenge before Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.