कोहलीवर अपेक्षांचे ओझे : कालुवितरणा

By Admin | Updated: August 9, 2015 22:46 IST2015-08-09T22:46:05+5:302015-08-09T22:46:05+5:30

भारताचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली विजयासाठी उत्सुक दिसत आहे; पण त्याच्यावर अपेक्षांचे ओझेही आहे, असे मत श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रोमेश कालुवितरणाने व्यक्त केले

The burden of expectations on Kohli: Kaluwitaran | कोहलीवर अपेक्षांचे ओझे : कालुवितरणा

कोहलीवर अपेक्षांचे ओझे : कालुवितरणा

कोलंबो : भारताचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली विजयासाठी उत्सुक दिसत आहे; पण त्याच्यावर अपेक्षांचे ओझेही आहे, असे मत श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रोमेश कालुवितरणाने व्यक्त केले.
कालुवितरणा म्हणाला,‘भारतात अपेक्षांचे दडपण अधिक असते. भारतात अनेकांना क्रिकेटमध्ये अधिक रुची आहे. कोहली कर्णधारपदाची जबाबदारी कशी निभावतो, याबाबत उत्सुकता आहे. कोहलीला हे अपेक्षांचे ओझे सांभाळावे लागणार आहे. नवा कर्णधार चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असतो व कोहली विजयासाठी भुकेला असल्याचे भासत आहे.’
श्रीलंका ‘अ’ संघाचा प्रशिक्षक आणि तीन दिवसीय सराव सामन्यादरम्यान बोर्ड अध्यक्ष एकादशचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या कालुवितरणाने आगामी तीन कसोटी सामन्यांची मालिका श्रीलंका संघासाठी महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. कालुवितरणा म्हणाला, ‘श्रीलंकेसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. पाकिस्तानविरुद्धच्या यापूर्वीच्या मालिकेत आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पुनरागमन करण्यासाठी आमचा मार्ग आम्हालाच शोधावा लागणार आहे. भविष्यात संघाची वाटचाल कशी राहील हे या मालिकेनंतर निश्चित होईल. याव्यतिरिक्त श्रीलंका संघ दिग्गज फलंदाज संगकाराला मालिका विजयासाठी भेट देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.’
भारताने १२ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या मालिकेपूर्वी एकमेव सराव सामना अनिर्णीत राखला. मालिकेसाठी या सामन्याच्या निकालाला विशेष महत्त्व नसल्याचे कालुवितरणा म्हणाला. भारताने सराव सामन्यात दोन्ही डावांत अनुक्रमे ३५१ व १८० धावा फटकावल्या. भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करताना अध्यक्ष एकादशचा पहिला डाव १२१ धावांत गुंडाळाला. भारतातर्फे अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली तर शिखर धवन, के. एल. राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे फलंदाजही धावा फटकावण्यात यशस्वी ठरले. भारतीय गोलंदाजांमध्ये विशेषत: ईशांत शर्मा व रविचंद्रन अश्विन यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली, पण फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, कोहली व रिद्धिमान साहा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पाच गोलंदाजांना संधी देण्याची रणनीती आखली आहे. कालुवितरणा म्हणाला, ‘भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून याच रणनीतीने खेळत आहे, त्यामुळे येथेही त्यांनी याच रणनीतीचा वापर केला तर आश्चर्य वाटणार नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: The burden of expectations on Kohli: Kaluwitaran