मुंबईच्या धावांना ब्रेक
By Admin | Updated: October 24, 2015 02:52 IST2015-10-24T02:52:02+5:302015-10-24T02:52:02+5:30
अष्टपैलू अभिषेक नायरने मोक्याच्यावेळी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर बलाढ्य मुंबईने रणजी ट्रॉफीच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी यजमान बडोदासमोर ४४७ धावा उभारल्या

मुंबईच्या धावांना ब्रेक
वडोदरा : अष्टपैलू अभिषेक नायरने मोक्याच्यावेळी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर बलाढ्य मुंबईने रणजी ट्रॉफीच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी यजमान बडोदासमोर ४४७ धावा उभारल्या. पहिल्या दिवशी दिडशतक झळकारवणारा श्रेयश अय्यर आणि अर्धशतकवीर सुर्यकुमार यादव हे नाबाद फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर नायरने एकाकी किल्ला लढवला. यानंतर यजमानांनी सावध सुरुवात करताना दुसऱ्या दिवसअखेर एक बाद १३३ धावा अशी मजल मारली. बडोदा अद्यापही ३१४ धावांनी पिछाडीवर आहे.
पहिल्या दिवसाची श्रेयश आणि सुर्यकुमार यांची खेळी पाहून त्यांच्याकडून अनुक्रमे द्विशतक आणि शतकाची अपेक्षा होती. मात्र श्रेयश सलग दुसरे द्विशतक झळकावण्यात अपयशी ठरला. ३ बाद ३१७ या धावसंख्येवरुन सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम श्रेयश बाद झाला. तो आपल्या वैयक्तिक धावसंख्येत केवळ ६ धावांची भर काढून परतला. तर यानंतर लगेच सुर्यकुमारही वैयक्तिक धावसंख्येत केवळ २ धावांची भर घालून ६८ धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे यानंतर कर्णधार आदित्य तरे, सिध्देश लाड आणि अभिषेक राऊतही लगेच बाद झाल्याने मुंबईची ३ बाद ३१७ धावसंख्येवरुन ८ बाद ३२७ अशी अवस्था झाली.
यावेळी एकाबाजूने खंबीरपणे उभा राहिलेल्या नायरने संयमी खेळी करुन मुंबईला चारशेचा टप्पा पार करुन दिला. शार्दुल ठाकूरने त्याला निर्णायक सात देऊन ३१ चेंडूत ४ चौकारांसह २४ धावांची खेळी केली. नायर १२१ चेंडूत १४ चौकार व एक षटकार खेचून ८९ धावांची उपयुक्त खेळी करुन माघारी परतला. अजितेश अरगळने सर्वाधिक ४ बळी घेत मुंबईला धक्के दिले. तर सागर मंगळोरकर (१), हार्दिक पांड्या (२) आणि युसुफ पठाण (१) यांनीही चांगला मारा केली.
बडोदाने फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर त्यांना २० धावसंख्येवर पहिला धक्का बसला.
धवल कुलकर्णीने सलामीवीर
मोनिल पटेलला बाद केले. मात्र
नंतर केदार देवधर आणि
कर्णधार आदित्य वाघमोडे
यांनी नाबाद ११३ धावांची भागीदारी करुन बडोदाला सावरले.
देवधर नाबाद ८४ धावांसह खेळपट्टीवर टिकून आहे. तर वाघमोडेही नाबाद ३५ धावांची खेळी करुन देवधरला साथ देत आहे.
धावफलक
मुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर झे. हूडा गो. पांड्या ६७, धवल कुलकर्णी त्रि. गो. अरगळ ३, श्रीदीप मांगेला पायचीत गो. मंगलोरकर ११, श्रेयश अय्यर धावबाद (पठाण) १७३, सुर्यकुमार यादव झे. शाह गो. अरगळ ६८, आदित्य तरे झे. पठाण गो. पांड्या १, सिध्देश लाड झे. शाह गो. अरगळ ०, अभिषेक नायर झे. वाघमोडे गो. पठाण ८९, अभिषेक राऊत झे. मंगलोरकर गो. अरगळ ०, शार्दुल ठाकुर धावबाद (पटेल) २४, विशाल दाभोळकर नाबाद ५. अवांतर - ६. एकूण : १२७.१ षटकांत सर्व बाद ४४७ धावा.
गोलंदाजी : मुर्तुजा वोहरा २६-३-९५-०; सागर मंगलोरकर १८-१-७६-१; अजितेश अरगळ २५-९-६७-४; हार्दिक पांड्या २२-११-५०-२; दीपक हुडा ७-१-२३-०; स्वप्निल सिंग १९-१-९४-०; युसूफ पठाण ९.१-१-३४-१; आदित्य वाघमोडे १-०-३-०.
बडोदा (पहिला डाव) : केदार देवधर खेळत आहे ८४, मोनिल पटेल झे. यादव गो. कुलकर्णी १०, आदित्य वाघमोडे खेळत आहे ३५. अवांतर - ४. एकूण : ४५ षटकांत १ बाद १३३ धावा.
गोलंदाजी : शार्दुल ठाकूर ११-०४४-०; धवल कुलकर्णी ११-२- ३१-१; अभिषेक नायर ९-२-१४-०; विशाल दाभोळकर ८-३-२१-०; अभिषेक राऊत ६-०-१९-०.