Breaking : Maharashtra Rahul Aware to participate in wrestling World Championship | ब्रेकिंगः महाराष्ट्राचा मल्ल निघाला जग जिंकायला; राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

ब्रेकिंगः महाराष्ट्राचा मल्ल निघाला जग जिंकायला; राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुंबई : महाराष्ट्राचा कुस्तीपटूराहुल आवारेची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मंगळवारी या स्पर्धेसाठी पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला. 14 सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची पायरी आहे. त्यामुळे राहुलकडून अनेकांच्या अपेक्षा लागल्या आहेत.

संघटनेतील राजकारणाचा बळी पडल्यानं राहुलला 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यानं 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले आणि विरोधकांना चपराक लगावली. राहुलने राष्ट्रकुल स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. आता त्यानं निवड चाचणी स्पर्धेत 61 किलो वजनी गटात बाजी मारून जागतिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली आहे. उपांत्य फेरीत त्यानं नवीन कुमारवर 9-4 असा मोठा विजय मिळवला होता.

राहुलने 2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. नुकतेच 'लोकमत'ने  त्याला  'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले. राष्ट्रकुल स्पर्धेत त्यानं 57 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता, परंतु त्या जागतिक स्पर्धेत 61 किलो वजनी गटात खेळावे लागणार आहे.

''मी मागच्या 2-3 स्पर्धांमध्ये 61 किलो वजनी गटातून खेळलो. त्यापैकी पहिल्या दोन स्पर्धांमध्ये मी कांस्यपदक जिंकले आणि एका स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे जागतिक स्पर्धेतही मला पदकाची अपेक्षा आहे,'' असे राहुलने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.  राहुलसह दोन ऑलिम्पिक पदक नावावर असलेल्या सुशील कुमारनेही जागतिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. त्याने जितेंदर कुमारला पराभूत केले. 
 

पुरुष फ्रिस्टाईल भारतीय संघ
रवी दहीया ( 57 किलो), राहुल आवारे ( 61 किलो), बजरंग पुनिया ( 65 किलो), करण मोर ( 70 किलो), सुशील कुमार ( 74 किलो), दीपक पुनिया ( 86 किलो) , प्रवीण ( 92 किलो), मौसम खत्री ( 97 किलो), सुमित मलिक ( 125 किलो).   
 

Web Title: Breaking : Maharashtra Rahul Aware to participate in wrestling World Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.