बॉक्सिंग, कबड्डी, नेमबाजीत छाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:25 IST2016-02-16T03:25:50+5:302016-02-16T03:25:50+5:30
भारतीय बॉक्सर्सनी स्पर्धेतील सर्व सातही सुवर्णपदक पटकावल्यानंतर नेमबाजांनीही २५ सुवर्णवेध घेताना आपल्या मोहिमेची शानदार सांगता केली.

बॉक्सिंग, कबड्डी, नेमबाजीत छाप
गुवाहाटी : भारतीय बॉक्सर्सनी स्पर्धेतील सर्व सातही सुवर्णपदक पटकावल्यानंतर नेमबाजांनीही २५ सुवर्णवेध घेताना आपल्या मोहिमेची शानदार सांगता केली. या जोरावर भारताना १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) आपला दबदबा कायम राखला.
मंगळवारी समारोप होणाऱ्या या स्पर्धेत भारताने १८१ सुवर्ण, ८८ रौप्य आणि ३० कांस्य अशी लयलूट करताना आतापर्यंत एकूण पदकसंख्या २९९ वर नेली आहे. त्याचवेळी श्रीलंका १८१ पदकांसह (२५ सुवर्ण, ६० रौप्य व ९६ कांस्य) आणि पाकिस्तान १०० पदकांसह (११ सुवर्ण, ३५ रौप्य व ५५ कांस्य) पदकांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत.
बॉक्सर्स व नेमबाजांप्रमाणेच ज्युडो खेळाडूंनीही ७ सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई केली. तसेच भारताने महिलांच्या फुटबॉलमध्ये नेपाळचा ४-० असा धुव्वा उडवून सुवर्ण मिळवले. तर पुरुषांमध्ये नेपाळने बलाढ्य भारताला २-१ असे नमवून अनपेक्षित सुवर्ण पटकावले. हँडबॉल पुरुष व महिला गटात अनुक्रमे पाकिस्तान व बांगलादेशला नमवून भारताने सुवण जिंकले
गुरप्रीत, श्वेता यांचा ‘सुवर्णवेध’
भारतीय नेमबाजांनी अखेरच्या दिवशी क्लीनस्वीप करत नेमबाजीत एकूण २६ पैकी २५ सुवर्णपदके जिंकली. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या गुरप्रीत सिंगने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये २८ अचूक नेम साधत सुवणवेध घेतला. श्वेता सिंगने १० मीटर एअर पिस्तूल गटात १९४.४ गुणांसह सुवर्ण जिंकले. हीना सिद्धूला मात्र रौप्यवर समाधान मानावे लागले.