जिनिव्हा : भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांच्या घेऱ्यात अडकल्याने जागतिक पातळीवर टीकेची झोड उठणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) हंगामी अध्यक्ष सॅप ब्लेटर आपल्या पदावर कायम राहणार आहेत. सध्या तरी ते पद सोडण्यास तयार नाहीत. स्वीत्झर्लंडच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या हवाल्यानुसार, ब्रिटिश संसदेच्या दबावानंतरही पद न सोडणारे ब्लेटर यांनी अध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिला होता; परंतु उत्तराधिकारी न मिळाल्याने ते या पदावर कायम राहणार आहेत. त्यांना आफ्रिका आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे समर्थन मिळेल, असा विश्वास आहे. सूत्रांनुसार, या महासंघांनी त्यांना तसा संदेशही पाठवला आहे. फिफाने मात्र याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पाच वेळा फिफाचे अध्यक्ष राहिलेल्या ब्लेटर यांचा उत्तराधिकारी निवडण्याच्या उद्देशाने डिसेंबरमध्ये ज्युरिच येथे विशेष कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकीची तारीखही निश्चित केली जाईल. वृत्तानुसार, फिफाचे संचालक (माहिती) वाल्टर डी ग्रेगोरियो यांच्या राजीनाम्यानंतर ब्लेटर यांची आशा अधिक वाढली असून त्यांनी पुन्हा एकदा या जागतिक महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली. या वृत्ताबाबत ग्रेगोरियो यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
फिफा अध्यक्षपदी कायम राहणार ब्लेटर
By admin | Updated: June 15, 2015 01:01 IST