बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळू द्या : श्रीनिवासन
By Admin | Updated: November 22, 2014 04:13 IST2014-11-22T02:03:00+5:302014-11-22T04:13:25+5:30
न्या. मुकुल मुद्गल समितीने आयपीएल-६ मधील फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपातून दोषमुक्त केल्यामुळे मला कामकाज सांभाळण्याची परवानगी देण्यास हरकत नाही

बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळू द्या : श्रीनिवासन
नवी दिल्ली : आयपीएलमधील फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या कामकाजापासून दूर असलेले एन. श्रीनिवासन यांनी आज, शुक्रवारी सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर करीत अध्यक्षपदाचे कामकाज पाहण्याची परवानगी मागितली आहे.
न्या. मुकुल मुद्गल समितीने आयपीएल-६ मधील फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपातून दोषमुक्त केल्यामुळे मला कामकाज सांभाळण्याची परवानगी देण्यास हरकत नाही, असा युक्तिवाद श्रींनी केला. आयसीसीचेदेखील अध्यक्ष असलेले श्रीनिवासन पुढे म्हणाले, ‘मुदगल समितीने मला दोषमुक्त केल्याने आता बोर्डाच्या प्रमुखपदाचा कारभार पाहण्याची परवानगी दिली जावी.’ कोर्टाने समितीचा तपास पूर्ण होईपर्यंत अध्यक्षपदापासून दूर राहण्याचे निर्देश त्यांना दिले होते. तेव्हापासून ते बोर्डाच्या कामकाजापासून दूर आहेत. बोर्डाचे चार अधिकारी, तसेच काही खेळाडू संशयास्पद घडामोडीत सामील असल्याची माहिती असताना बोर्डाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई का केली नाही? असा सवाल मुद्गल समितीच्या अहवालात उपस्थित करण्यात आला होता. त्याविषयी श्रींनी एक शपथपत्र दाखल केले. त्यात म्हटले आहे की, ‘अहवालात उल्लेख असलेल्या तिन्ही खेळाडूंना तोंडी समज दिली होती. त्यावेळी बोर्डाचे अध्यक्ष असलेले अॅड. शशांक मनोहर यांनीदेखील खेळाडूंच्या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केले होते.’(वृत्तसंस्था)