बीसीसीआयची बैठक १८ आॅक्टोबरला
By Admin | Updated: October 10, 2015 05:35 IST2015-10-10T05:35:13+5:302015-10-10T05:35:13+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यसमितीची बैठक पुन्हा एकदा १८ आॅक्टोबर रोजी बोलविण्यात आली आहे. सुरुवातीला ही बैठक स्थगित करण्यात आली होती.

बीसीसीआयची बैठक १८ आॅक्टोबरला
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यसमितीची बैठक पुन्हा एकदा १८ आॅक्टोबर रोजी बोलविण्यात आली आहे. सुरुवातीला ही बैठक स्थगित करण्यात आली होती. यापूर्वी २८ आॅगस्ट रोजी कार्यसमितीची बैठक अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली होती आणि एन. श्रीनिवासन यांना बैठकीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे किंवा नाही, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचे निश्चित केले होते.
गेल्या रविवारी बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झालेले शशांक मनोहर या बैठकीमध्ये सुधारणांबाबत चर्चा करणार आहेत. मनोहर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोर्डाच्या कारभारात सुधारणा करण्याचे स्पष्ट केले होते. मनोहर यांनी बोर्डाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आणि कारभारामध्ये पारदर्शिता आणण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याचे संकेत दिले होते. याव्यतिरिक्त आयपीएलच्या आयोजनाबाबत चर्चा होणार आहे. कारण चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स या संघांना सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.
बैठकीमध्ये बोर्डाच्या आमसभेची तारीख निश्चित करण्यात येईल. आमसभेचे आयोजन सप्टेंबर महिन्याच्या पूर्वी करणे शक्य नाही. कटकमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी मैदानावर बॉटल्स भिरकावल्याच्या प्रकरणावरही या बैठकीत चर्चा होईल. मनोहर यांनी ओडिशा क्रिकेट संघटनेला अहवाल मागवला आहे. (वृत्तसंस्था)