आॅस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यात वर्चस्वाची लढाई
By Admin | Updated: March 8, 2015 01:39 IST2015-03-08T01:39:44+5:302015-03-08T01:39:44+5:30
विश्वचषकाच्या ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर कोण राहणार, यासाठी आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंका उद्या (रविवारी) ‘दोन हात’ करण्यास उतरणार आहेत.

आॅस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यात वर्चस्वाची लढाई
सिडनी : विश्वचषकाच्या ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर कोण राहणार, यासाठी आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंका उद्या (रविवारी) ‘दोन हात’ करण्यास उतरणार आहेत. या गटात न्यूझीलंड अव्वल स्थानावर राहील, हे जवळपास पक्के आहे. आॅस्ट्रेलिया आणि १९९६ चा विजेता श्रीलंका यांच्यापैकी ज्यांची सरशी होईल तो संघ क्वार्टर फायनलमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध खेळणार नाही.
श्रीलंकेने चारपैकी तीन सामने जिंकले. संघाला सहा गुण असून, आॅस्ट्रेलियाच्या तुलनेत एक गुण जास्त आहे. मायकेल क्लार्कच्या आॅस्ट्रेलियाने मागील सामन्यात अफगाणिस्तानला २७५ धावांनी लोळविले होते. श्रीलंकेचा संघ फॉर्ममध्ये आहे. मागच्या सामन्यात वेलिंग्टन येथे ३१० धावांचा पाठलाग करीत इंग्लंडला ४७.२ षटकांत लक्ष्य गाठून नऊ गड्यांनी पराभूत केले होते. इंग्लंडविरुद्ध शतकी झंझावात करणारे लाहिरु थिरिमाने आणि कुमार संगकारा हे सर्वाधिक धावा काढणाऱ्या दहा फलंदाजांच्या पंक्तीत आहेत.
उद्याच्या सामन्यात लंकेला दुखापतग्रस्त फिरकी गोलंदाज रंगना हेरथ याच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. याशिवाय सरावादरम्यान बोटाला इजा झाल्याने फलंदाज दिमूथ करुणारत्ने स्पर्धेबाहेर पडला आहे.
आॅस्ट्रेलियाचा बांगलादेशविरुद्धचा पावसात वाहून गेलेला सामना तसेच न्यूझीलंडकडून एका गड्याने पत्करावा लागलेला पराभव महागडा ठरू शकतो. याशिवाय सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांत चौथ्या स्थानावर असलेला मिशेल स्टार्क याच्या नेतृत्वात वेगवान माऱ्याचे आव्हान लंकेच्या फलंदाजांपुढे असेल. कमरेचे दुखणे उसळल्याने पॅट कमिन्स हा दुसरा वेगवान गोलंदाज खेळू शकणार नाही. (वृत्तसंस्था)
हेड टू हेड
या दोन्ही संघामध्ये आत्तापर्यंत ६८ सामने झाले असून आॅस्ट्रेलियाने ४६ तर श्रीलंकेने २० लढती जिंकल्या आहेत. दोन सामन्यांचे निकाल लागू शकले नाही.
विश्वचषकात हे दोन्ही संघ ९ वेळा एकमेकांसमोर आले आहेत.
आॅस्ट्रेलियाने ६ वेळा तर श्रीलंकेने २ वेळा विजय नोंदविला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहीरू थिरीमने (उपकर्णधार), दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेरथ, महेला जयवर्धने, दिमुथ करूणारत्ने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, धम्मिका प्रसाद, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), सचिथ्रा सेनानायके.
आॅस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पॅट क्युमिन्स, झेव्हिएर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अॅरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), जोश हेजलवुड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हीड वॉर्नर, शेन वॉटसन.