जो फलंदाजीच्या नंबर वन ‘रुट’वर
By Admin | Updated: October 27, 2015 23:46 IST2015-10-27T23:46:54+5:302015-10-27T23:46:54+5:30
इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जो रुट याने पुन्हा कसोटीतील अव्वल फलंदाजाचे स्थान मिळविले आहे. तर, भारताच्या विराट कोहली ११ वरून १३वर घसरला आहे.

जो फलंदाजीच्या नंबर वन ‘रुट’वर
दुबई : इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जो रुट याने पुन्हा कसोटीतील अव्वल फलंदाजाचे स्थान मिळविले आहे. तर, भारताच्या विराट कोहली ११ वरून १३वर घसरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच कसोटी क्रमावारी जाहीर केली. त्यानुसार, रुटने दुबईत झालेल्या कसोटी सामन्यांत पाकिस्तानविरुद्ध ८८ व ७१ धावांची खेळी केली होती. त्यात त्याने आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला मागे टाकून अव्वल स्थान प्राप्त केले. दुबई मालिकेपूर्वी रुट हा स्मिथपेक्षा १३ गुणांनी मागे होता. आता त्याने स्मिथला ३ गुणांनी मागे टाकले आहे. सध्या जरी त्याने अव्वल स्थान प्राप्त केले असले, तरी त्याला येत्या रविवारपासून शारजा येथे होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही चांगली कामगिरी करावी लागेल.
कोहलीनंतर भारताचा चेतेश्वर पुजारा २०व्या, मुरली विजय २१, अजिंक्य रहाणे २२, शिखर धवन ३२ व रोहित शर्मा ४६व्या स्थानी आहेत. दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हक व असद शफीक यांच्या कामगिरीमुळे त्याला दोन अंकांचे नुकसान झाले आहे. मिस्बाहने १०२ व ८७ धावा करून क्रमावारीत ५ अंकांची सुधारणा करून ११व्या स्थानी झेप घेतली. शफीकने ८३ व ८७ धावांची खेळी करून आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ १२वे स्थान मिळविले. त्याने कोहलीसह रॉस टेलर, शिवनारायण चंद्रपाल, ब्रँडन मॅक्युलम व फाफ डु प्लेसिस यांना मागे टाकले. युनीस खान याने ५६ व ११८ धावांची खेळी केल्याने अव्वल ५ फलंदाजांत स्थान मिळविले आहे.
गोलंदाजीत भारताचा रविचंद्रन आश्विन आठव्या स्थानी कायम आहे. अव्वल गोलंदाजांत डेल स्टेन याने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. दुबईत ८ बळी मिळविणारा पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासीर शाह याने प्रथमच दुसरे स्थान मिळविले आहे. स्टेनपेक्षा तो ७८ गुणांनी मागे आले. भारताचा ईशांत शर्मा १९, तर रवींद्र जडेजा ३०व्या स्थानी आहेत. श्रीलंकेचा धम्मिका १५, पाकिस्तानचा वहाब रियाज ३५, इम्रान खान ४७, इंग्लंडचा मार्क वुड ४८, वेस्ट इंडीजचा कर्णधार जॅसन होल्डर ४९व्या स्थानी आहे. या सर्वांनी आपली आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ स्थान मिळविले आहे.