विजयाचे श्रेय फलंदाजांना : विराट
By Admin | Updated: April 14, 2016 02:55 IST2016-04-14T02:55:41+5:302016-04-14T02:55:41+5:30
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४५ धावांनी मिळालेल्या विजयाचे श्रेय फलंदाजांना दिले.

विजयाचे श्रेय फलंदाजांना : विराट
बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४५ धावांनी मिळालेल्या विजयाचे श्रेय फलंदाजांना दिले.
सामन्यानंतर विराट म्हणाला, ‘‘आम्ही नाणेफेक गमावली होती आणि आम्हाला येथे वेगवान सुरुवात हवी होती. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती आणि त्या खेळपट्टीवर जास्तीत जास्त धावा करण्याचा आमचा इरादा होता. ख्रिस गेल प्रारंभीच बाद झाला होता आणि धावगती उंचावण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अॅबी डिव्हिलियर्सवर होती. आमच्या दोघांदरम्यान चांगली भागीदारी होऊ शकली, याचा मला आनंद आहे. मी आणि डिव्हिलियर्सने गेल्या वर्षीही मुंबईत चांगली भागीदारी केली होती आणि आम्ही येथे पुन्हा आपल्या खेळीला मजबुती देऊ शकलो. डिव्हिलियर्सने लाजवाब फलंदाजी केली आणि सुरुवातीला नजर बसल्यानंतर मनाप्रमाणे धावा लुटल्या. मी शानदार पद्धतीने चेंडू फटकावत होतो आणि आमच्या भागीदारीने संघाचा मजबूत धावसंख्येचा पाया रचला गेला.’’
विराट म्हणाला, ‘‘हैदराबाद संघाने पोषक खेळपट्टीवर विजयी लक्ष्याचा जोरदार पाठलाग केला; परंतु लक्ष्य खूप मोठे होते आणि अखेर आमचे गोलंदाज त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरले.’’
सामनावीर डिव्हिलियर्स म्हणाला, ‘‘मला येथे खेळणे नेहमीच आवडते आणि जेव्हा दुसऱ्या एंडकडून विराटसारखा सहकारी असेल तेव्हा तुम्हाला मोकळेपणाने खेळण्याची संधी असते. मी नेहमीप्रमाणेच येथे फलंदाजीचा आनंद लुटला आणि विराटसोबत मोठी भागीदारी करण्यात यशस्वी ठरलो. आमच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांवर नियंत्रण ठेवताना आम्हाला शानदार विजय मिळवून दिला.’’ (वृत्तसंस्था)