बंगलोर एबी ‘पॉझिटिव्ह’
By Admin | Updated: May 5, 2014 14:59 IST2014-05-05T14:58:57+5:302014-05-05T14:59:31+5:30
युएईमध्ये पडलेला विजयाचा दुष्काळ रॉयल्स चॅलेंर्जस बंगलोरने आपल्या होमग्राउंडवर संपविला. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांनी सनरायर्जस हैदराबाद संघावर ४ विकेट्स आणि १ चेंडू शिल्लक ठेवून मात केली.

बंगलोर एबी ‘पॉझिटिव्ह’
बंगलोर : युएईमध्ये पडलेला विजयाचा दुष्काळ रॉयल्स चॅलेंर्जस बंगलोरने आपल्या होमग्राउंडवर संपविला. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांनी सनरायर्जस हैदराबाद संघावर ४ विकेट्स आणि १ चेंडू शिल्लक ठेवून मात केली. एबी डिव्हीलियर्सने ६ चौकार आणि ८ षटकारांसह ४१ चेंडूत तडाखेबंद नाबाद ८९ धावांची खेळी करून सामना खेचून आणला. डिव्हीलियर्स खेळायला आला तेव्हा ३ बाद ३८ अशी संकटमय परिस्थिती होती. त्यात गेल (२७), आणि विराट कोहली (0) तंबूत परतले होते. अशावेळी एबीने ‘पॉझिटिव्ह’ अँप्रोचने तडाखेबंद खेळी करीत रॉयल चॅलेंर्जस बंगलोरला एकहाती सामना जिंकून दिला.
बंगलोर संघाने हैदराबाद संघाचा डाव ६ बाद १५५ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १९.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगलोर संघाची २ बाद ६ अशी निराशाजनक सुरुवात झाली होती. बंगलोर संघाला अखेरच्या दोन षटकांत विजयासाठी २८ धावांची गरज होती. डावाच्या १९व्या षटकात स्टेनच्या गोलंदाजीवर २४ धावा वसूल करीत बंगलोर संघाने विजय निश्चित केला. त्यापैकी २३ धावा डिव्हिलियर्सने वसूल केल्या. अखेरच्या षटकात बंगलोर संघाला विजयासाठी केवळ ४ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर स्टार्क धावबाद झाल्यामुळे रंगत निर्माण झाली, पण डिव्हिलियर्सने पाचव्या चेंडूवर चौकार वसूल करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
बंगलोरच्या डावात ख्रिस गेल (२७ धावा, १९ चेंडू, ३ चौकार, २ षट्कार), युवराज सिंग (१४ धावा, १ चौकार, १ षटकार) आणि रोसू (१४ धावा, १ चौकार) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. सनरायर्जसतर्फे करण शर्मा (३-१७) व भुवनेश्वर कुमार (२-१६) यांचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.
त्याआधी, डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायर्जस संघाने आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारली. वॉर्नरने ४९ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने ६१ धावा फटकाविल्या. त्याने कर्णधार शिखर धवनच्या (३७) साथीने तिसर्या विकेटसाठी ६१ धावांची तर नमन ओझाच्या (१५) साथीने पाचव्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. बंगलोरतर्फे मिशेल स्टार्क व वरुण अँरोन यांनी अनुक्रमे २१ व ३३ धावांच्या मोबदल्यात
२ बळी घेतले. (वृत्तसंस्था)