कसोटीसाठी भारतीय गोलंदाजी आक्रमण संतुलित : श्रीनाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2015 23:47 IST2015-10-27T23:47:59+5:302015-10-27T23:47:59+5:30
कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारताची गोलंदाजीची बाजू संतुलित असून, ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी

कसोटीसाठी भारतीय गोलंदाजी आक्रमण संतुलित : श्रीनाथ
नवी दिल्ली : कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारताची गोलंदाजीची बाजू संतुलित असून, ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेत यजमान संघाला याचा लाभ मिळेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने व्यक्त केले.
गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला अलीकडेच टी-२० व वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला, पण मोहालीमध्ये प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करतील, अशी आशा श्रीनाथने व्यक्त केली.
श्रीनाथ म्हणाला, की भारताचे वेगवान आणि फिरकी माऱ्याचे संयोजन नेहमी यशस्वी ठरले आहे. मायदेशात खेळताना फिरकीपटूंची भूमिका नेहमी उल्लेखनीय ठरली आहे. वेगवान गोलंदाज ५० टक्के बळी घेण्यात यशस्वी ठरले नाही, तरी ४० टक्के बळी घेण्यात यशस्वी ठरू शकतात. जर, यात फिरकीपटूंचा समावेश राहिला, तर भारताची गोलंदाजीची बाजू अधिक मजबूत होईल आणि कसोटी मालिकेत त्याचा यजमान संघाला लाभ मिळेल.
भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहणाऱ्या ईशांत शर्माला एका सामन्याच्या बंदीच्या शिक्षेमुळे मोहाली कसोटी सामन्यात खेळता येणार नाही.