आॅस्ट्रेलियाची दमदार मजल

By Admin | Updated: December 28, 2015 03:32 IST2015-12-28T03:32:46+5:302015-12-28T03:32:46+5:30

आघाडीच्या चार फलंदाजांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात दमदार मजल मारणाऱ्या आॅस्ट्रेलियाने रविवारी प्रत्युत्तरात खेळणाऱ्या वेस्ट इंडीज संघाची नाजूक अवस्था केली.

Australia's strong swing | आॅस्ट्रेलियाची दमदार मजल

आॅस्ट्रेलियाची दमदार मजल

मेलबोर्न : आघाडीच्या चार फलंदाजांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात दमदार मजल मारणाऱ्या आॅस्ट्रेलियाने रविवारी प्रत्युत्तरात खेळणाऱ्या वेस्ट इंडीज संघाची नाजूक अवस्था केली. दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली.
आॅस्ट्रेलियाने पहिला डाव ३ बाद ५५१ धावसंख्येवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडीजची ६ बाद ९१ अशी अवस्था झाली आहे. विंडीजला आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ४६० धावांची गरज असून, त्यांच्या चार विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्या वेळी डॅरेन ब्राव्हो (१२) आणि पदार्पणाची कसोटी खेळणारा कार्लोस ब्रेथवेट (३) खेळपट्टीवर होते.
होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे ही लढतही एकतर्फी असल्याचे चित्र आहे. विंडीजच्या एकाही फलंदाजाला आॅस्ट्रेलियाच्या माऱ्याला समर्थपणे तोंड देता आले नाही. आॅस्ट्रेलियातर्फे पीटर सीडल (१९ धावांत २), नॅथन लियोन (१८ धावांत २) आणि जेम्स पॅटिन्सन (३६ धावांत २ ) यशस्वी गोलंदाज ठरले. त्याआधी, सकाळच्या सत्रात कालच्या ३ बाद ३४५ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलियातर्फे कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाबाद १३४ आणि अ‍ॅडम व्होजेसने नाबाद १०६ धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २२३ धावांची अभेद्य भागीदारी केली. व्होजेसने शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळाने स्मिथने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. स्मिथचे कारकिर्दीतील १३, तर या वर्षातील सहावे कसोटी शतक आहे. त्याने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण आठ शतके झळकावताना न्यूझीलंडच्या केन विलियम्सनच्या विक्रमाची बरोबरी केली. (वृत्तसंस्था)
> स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाने विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी शतकी खेळी केली. ख्वाजाच्या शतकी खेळीसह आॅस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन प्रकारच्या क्रिकेटमध्ये एक हजार शतके ठोकण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा आॅस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे. शतके ठोकणाऱ्या संघांमध्ये इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या नावावर ९६४ शतकांची नोंद आहे. भारताने एकूण ६८८ शतके ठोकली असून, या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडीज संघ ६२९ शतकांसह चौथ्या, पाकिस्तान (५४३) पाचव्या स्थानावर आहे. ७७ शतकांसह बांगलादेश अखेरच्या १० व्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका संघ (५०१), श्रीलंका (३९३), न्यूझीलंड (३७७), झिम्बाब्वे (१०७) यांचा या यादीत समावेश आहे.
>धा व फ ल क
आॅस्ट्रेलिया ५५१/३ घोषित. वेस्ट इंडिज ९१/६
आॅस्ट्रेलिया : स्टिव्ह स्मिथ नाबाद १३४ , अ‍ॅडम व्होजेस नाबाद १०६, गोलंदाजी : जेरोमी टेलर २/९७, क्रेग ब्रेथवेट १/७८.
वेस्ट इंडिज : क्रेग ब्रेथवेट १७, राजेंद्र चंद्रिका २५, डॅरेन ब्राव्हो १३ खेळत आहे., जेरमन ब्लॅकवुड २८, कार्लोस ब्रेथवेट ३ खेळत आहे. गोलंदाजी : जेम्स पॅटिन्सन २/३६, नॅथन लायन २/१८, पीटर सिडल २/१९

Web Title: Australia's strong swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.