रोहितच्या तंदुरुस्तीकडे लक्ष
By Admin | Updated: January 29, 2015 03:14 IST2015-01-29T03:04:50+5:302015-01-29T03:14:18+5:30
इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी येथे होणा-या सामन्याची तयारी करणाऱ्या भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या तंदुरुस्तीकडे लागले आहे.

रोहितच्या तंदुरुस्तीकडे लक्ष
पर्थ : इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी येथे होणा-या सामन्याची तयारी करणाऱ्या भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या तंदुरुस्तीकडे लागले आहे. भारतासाठी हा सामना महत्त्वाचा असून, भारताला या सामन्यात विजय मिळविणे गरजेचेच आहे. रोहित शर्माच्या स्नायूला दुखापत झाली आहे.
दोन सामन्यांत पराभव आणि एका सामन्यात पावसामुळे बरोबरी झाल्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवावा लागेल. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे भारतीय फलंदाजीच्या क्रमावर परिणाम झाला आहे. शिखर धवनसह अजिंक्य रहाणे डावाची सुरुवात करीत आहे. त्यामुळे अंबाती रायुडू तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे.
दरम्यान, दुखापतीमुळे रोहितला विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार नाही, ही एक भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट आहे. रोहित दुखापतीमधून हळूहळू बरा होत आहे. त्याने सिडनी येथील मैदानावर नेटमध्ये सराव केला. त्यामुळे तो शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात खेळू शकतो, असा अंदाज आहे. धवन सध्या खराब फॉर्ममध्ये असून, रोहित शर्मा रहाणेबरोबर डावाची सुरुवात करू शकतो किंवा त्याला खालच्या क्रमांकावरही खेळवले जाऊ शकते.
(वृत्तसंस्था)