सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 08:29 IST2025-08-03T08:27:08+5:302025-08-03T08:29:04+5:30
माझे बाबा, अशोक कोनेरू, स्वतःच बुद्धिबळपटू होते. त्यामुळे घरात नेहमी बुद्धिबळातील मोहरे, पट आणि चाली यांची चर्चा व्हायची. अर्थात घरात वातावरण असले म्हणजे हा प्रवास सुखकर होतोच असे नाही...

सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
मी (कोनेरू हम्पी) लहानपणी जेव्हा पहिल्यांदा बुद्धिबळाचा पट पाहिला, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की, हे छोटे-छोटे मोहरे मला जगात ओळख मिळवून देतील. माझे बाबा, अशोक कोनेरू, स्वतःच बुद्धिबळपटू होते. त्यामुळे घरात नेहमी बुद्धिबळातील मोहरे, पट आणि चाली यांची चर्चा व्हायची. अर्थात घरात वातावरण असले म्हणजे हा प्रवास सुखकर होतोच असे नाही. मला आठवते, मी सहा वर्षांची असेन, एकदा बाबा कोणाशीतरी खेळत होते. मी त्यांच्या पटाकडे पाहत होते आणि सहजच मी त्यांना एक चाल सांगितली. त्यांनी ती चाल खेळली आणि ती यशस्वीही ठरली! त्या क्षणी बाबांना कळले की, मी काहीतरी वेगळी आहे. त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. मला याच खेळात योग्य मार्गदर्शन मिळाले तर मी देशातच नाही, जगातही नाव कमावू शकेल, याचा विश्वास त्यांना वाटला आणि माझा या बुद्धिबळाच्या दिशेचा प्रवास सुरू झाला.
वडिलांनी मला घडविण्यासाठी प्राध्यापकाची नोकरी सोडली
वडील प्राधापक होते. मला बुद्धिबळात पारंगत करण्यासाठी त्यांनी थेट नोकरीच सोडली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते तन-मन-धनाने माझ्यासोबत उभे राहिले. त्यांच्याशिवाय हा प्रवास होऊ शकला नसता.
... अन् हासणारे पाहतच राहिले
येथपर्यंत पोहोचताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आईवडिलांनी माझ्यासाठी खूप त्याग केला. अनेकदा समाजाचे टोमणेही त्यांनी सहन केले. एकदा आमच्या घरी संगणक घ्यावा की टीव्ही, असा प्रश्न निर्माण झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात असे निर्णय घेणे कठीण असतात.
तेव्हा वडिलांनी घरी टीव्ही न घेता माझ्यासाठी संगणक घेतला. त्या वेळी लोक हसले; पण पुढे मी एकेक जिंकत गेले अन् हसणारे पाहतच राहिले.
प्रेरणा घेत आले
वयानुसार आपली कारकिर्द मंदावू लागते. बुद्धिबळ हा मानसिक खेळ असला तरी, तुमची पातळी घसरते. मी या आव्हानावर मात करत आले. यातून प्रेरणा घेऊन अधिक मेहनत करत आले. माझ्यातील दृढनिश्चयाने मला हार मानू दिली नाही.
सन २०१४ मध्ये माझं लग्न झाले. नंतर संसार आणि आईमधून आलेली लेकरांची जबाबदारी. या काळात बुद्धिबळापासून दूर राहिले. पुन्हा परत येणे सोपे नव्हते; पण कितीही मोठा ब्रेक असो, जर मनात जिद्द असेल तर मोहरे पुन्हा जिंकवतातच.
(संकलन : महेश घोराळे)