Asian Games 2023 : इबाद अलीनं भारताची वाढवली शान! आशियाई स्पर्धेत सेलिंगमध्ये जिंकलं पदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:26 IST
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तिसऱ्या दिवशी भारताने सेलिंगमध्ये दोन पदकांची कमाई केली.
Asian Games 2023 : इबाद अलीनं भारताची वाढवली शान! आशियाई स्पर्धेत सेलिंगमध्ये जिंकलं पदक
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तिसऱ्या दिवशी भारताने सेलिंगमध्ये दोन पदकांची कमाई केली. १७ वर्षीय नेहा ठाकूरने मुलींच्या Dinghy - ILCA4 प्रकारात रौप्यपदक जिंकले. मध्यप्रदेशमधील अमलताज गावातली नेहा ही शेतकऱ्याची पोर आहे. तिने याचवर्षी आशियाई सेलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर इबाद अलीने ( Eabad Ali) पुरुषांच्या Windsurfer RS:X गटात कांस्यपदक जिंकले. त्याला तीन फेरींमध्ये अपयश आले होते, परंतु त्याने पुनरागमन केले अन् ५७ गुणांसह तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक निश्चित केले.
भारतीय पुरूष मेडली रिले संघाने ४ बाय १०० मीटर स्पर्धेत ३:४०.८४ सेकंदाची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम केला. यापूर्वी २०१८मध्ये ३:४४.९४ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम होता. आता भारतीय संघ फायनलमध्ये पदकासाठी खेळणार आहे. तलवारबाजीत भारताच्या भवानी देवीला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या शाओ याकीकडून १५-७ अशी हार मानावी लागली. भारताचे एक पदक गेले. भवानीने आज उल्लेखनीय कामगिरी करून इथपर्यंत मजल मारली होती, परंतु तिला पदकाने हुलकावणी दिली. या सामन्यात रेफरीने तिच्या विरोधात निकाल दिल्याचा आरोप भवानीने केला.
भारतीय पुरुष हॉकी संघाने आज अ गटातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरवर १६-१ असा दणदणीत विजय मिळवला. मनदीप सिंग ( १२ मि., ३० मि. व ५१ मि.) याची हॅटट्रीक अन् कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या ( २४मि. ३९ मि., ४०मि. व ४२ मि.) चार गोल्सच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. व्हीएस प्रसाद ( २३ मि.), गुरजंत सिंग ( २२ मि.), उपाध्याय ( १६ मि.), शमशेर सिंग ( ३८ मि.), मनप्रीत सिंग ( ३७ मि.) आणि अभिषेक ( ५१ मि. ५२ मि.) यांनी दमदार खेळ केला.