Asian Games 2018: १९८२ मध्ये महाराष्ट्र नंबर वन, २०१८ मध्ये घसरण... हे असं का झालं?
By स्वदेश घाणेकर | Updated: September 4, 2018 12:11 IST2018-09-04T12:11:32+5:302018-09-04T12:11:54+5:30
महाराष्ट्र राज्याला क्रीडा क्षेत्राची फार जुनी परंपरा लाभली आहे. देशाला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातले, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हाही महाराष्ट्राचा, हॉकीपटू धनराज पिल्ले, नेमबाज अंजली भागवत, बुद्धीबळपटू अभिजित कुंटे, रघुनंदन गोखले, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर आदी अनेक दिग्गज महाराष्ट्रातलेच... पण हा झाला इतिहास.

Asian Games 2018: १९८२ मध्ये महाराष्ट्र नंबर वन, २०१८ मध्ये घसरण... हे असं का झालं?
महाराष्ट्र राज्याला क्रीडा क्षेत्राची फार जुनी परंपरा लाभली आहे. देशाला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातले, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हाही महाराष्ट्राचा, हॉकीपटू धनराज पिल्ले, नेमबाज अंजली भागवत, बुद्धीबळपटू अभिजित कुंटे, रघुनंदन गोखले, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर आदी अनेक दिग्गज महाराष्ट्रातलेच... पण हा झाला इतिहास. जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे नाव गाजवणारे आज किती खेळाडू भारतीय क्रीडा क्षेत्रात आहेत, याचा विचार न केलेलाच बरा. लाल फितीत अडकलेलं क्रीडा धोरण, शिवछत्रपती पुरस्कारासाठी चाललेली वशीलेबाजी यामध्येच महाराष्ट्राचा 'खेळ' सुरू आहे. येथील मातीत आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याची क्षमता असूनही महाराष्ट्राची क्रीडा क्षेत्रात अधोगतीच सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हे विदारक चित्र पुन्हा समोर उभे राहत आहे.
जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकून 69 पदकं जिंकली. त्यात 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्यपदकांचा समावेश होता. आशियाई स्पर्धेचा इतिहास पाहता भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 2010च्या ग्वांझावू आशियाई स्पर्धेत भारताने 65 पदकं जिंकली होती. त्या तुलनेत हा आकडा वाढला, परंतु यात महाराष्ट्राचा वाटा किती तर फक्त सात पदकांचा... राही सरनोबत व दत्तु भोकनळ यांचे सुवर्ण, कबड्डी संघाचे एक रौप्य व कांस्यपदकात महाराष्ट्राचे वाटेकरी, हीना सिधूचे व ब्रिज स्पर्धेतील व स्क्वॉशमधील कांस्य हा असा महाराष्ट्राचा वाटा. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र किती पिछाडीवर आहे, हे यावरून कळते.
आपले मल्ल महाराष्ट्र केसरी किंवा जास्तीत जास्त हिंद केसरी जिंकलो की सर्व काही मिळवले, या थाटात फिरत असतात. मुंबईतील बरेच आखाडे तर मोठमोठाल्या इमारतींमध्ये नाहीसे झाले. जे आहेत त्यांची अवस्था न पाहावलेलीच बरी. कबड्डीची वेगळी स्थिती नाही. एकेकाळी महाराष्ट्राचा संघ म्हणजेच भारतीय संघ अशा समीकरणाची जागा हरयाणाने घेतली. नेमबाजीत राही, अयोनिका पॉल सोडलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली काय अवस्था आहे हे वेगळे सांगायला नको. माजी नेमबाज रोनक पंडित याने पंजाबच्या हीना सिधूशी लग्न केले, म्हणून हीनाने जिंकलेले पदक आपण महाराष्ट्राच्या खात्यात मोजतो. त्यातच आपली धन्यता. युवराज आणि देविंदर वाल्मिकी यांच्या रुपाने आपल्याला हॉकीत चांगले दिवस पाहायला मिळतील असे वाटले होते, परंतु प्रसिद्धीची हवा गेल्यावर प्रगती होणार ती कशी. बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, टेबल टेनिस, आदी खेळांत महाराष्ट्र अजून रांगत आहे.
हरयाणासारख्या राज्याला क्रीडा क्षेत्रात जे जमलं ते महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांना न जमणे, ही खरी शोकांतिका आहे . 1982 साली नवी दिल्लीत पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत महाराष्ट्रातील पदक विजेत्यांचा वाटा सर्वाधिक होता आणि 2018 मध्ये अव्वल तीन राज्यांत महाराष्ट्राला स्थान मिळवण्यात अपयश आले. अशीच परिस्थिती कायम राहिल्याच 'कुठे नेऊन ठेवलाय, महाराष्ट्र माझा?' असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणजे झाले.